Satara: किणीप्रमाणेच आनेवाडी टोलनाक्यावर सवलत द्या, काँग्रेसची आक्रमक मागणी
By नितीन काळेल | Published: August 7, 2024 07:42 PM2024-08-07T19:42:36+5:302024-08-07T19:43:07+5:30
आठ दिवसांत निर्णय घेण्याबाबत इशारा
सातारा : कोल्हापूर जिल्ह्यातील किणीप्रमाणेच आनेवाडी टोल नाक्यावरही सवलत द्यावी. २० किलाेमीटर परिघरातील गावांना १०० टक्के टोलमाफी देण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रीय काॅंग्रेसच्यावतीने करण्यात आली आहे. तसेच याबाबत आठ दिवसांत निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही काॅंग्रेसकडून देण्यात आलेला आहे.
याबाबत काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष डाॅ. सुरेश जाधव, सरचिटणीस नरेश देसाई, अॅड. दत्तात्रय धनावडे, अन्वर पाशा खान, मनोज तपासे आदींच्या उपस्थितीत भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणच्या प्रकल्प व्यवस्थापकांना निवेदन देण्यात आले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, कोल्हापूर ते पुणे दरम्यान महामार्गाची दुरवस्था झाली आहे. याचा त्रास प्रवाशी तसेच वाहनधारकांना होत आहे. यामुळे कोल्हापूर ते पुणे हद्दीतील सर्व टोलनाक्यावर महामार्गाचे काम पूर्ण होईपर्यंत वाहनधरकांकडून टोल वसूल करण्यात येऊ नये यासाठी काँग्रेसच्यावतीने शनिवार टोलनाक्यावर आंदोलन करण्यात आले हाेते. त्यावेळी आनेवाडी टोल नाक्यावरही आंदोलन झाले होते. या आंदोलनादम्यान सहायक व्यवस्थापक जोशी यांनी आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. तसेच मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले होते.
आंदोलनादरम्यान प्रकल्प व्यवस्थापकांनी लेखी पत्र दिले. मात्र, आपल्याच भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणच्या कोल्हापूर कार्यालयाने यासंदर्भात किणी (कोल्हापूर) टोलनाका आणि तासवडे (कऱ्हाड) या दोन्ही टोलाक्याबाबत २५ टक्के सरसकट वाहनांना टोल सवलत तर २० किलोमीटर परिघामधील गावांना १०० टक्के टोल माफीची सुट दिल्याचे नमूद केले आहे. यावरुन आनेवाडी आणि पुणे जिल्ह्यातील खेड शिवापूर टोलनाक्याविषयी दिलेले पत्र हे केवळ आमच्या समाधानासाठी आणि वेळ मारून नेण्यासाठी दिले असल्याचे स्पष्ट होत आहे. याचा विचार करावा, असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आलेले आहे.
..तर ठिकाणी एकाचवेळी आंदोलन होणार
कोल्हापूर येथील विभागाने दिलेली सवलत आणि सूट आनेवाडी टोलनाक्यावर देण्यात यावी. याबाबतचा निर्णय येत्या आठ दिवसांत घ्यावा. तसेच न झाल्यास पुन्हा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल. हे आंदोलन एकाचवेळी आणि एकाच दिवशी पुणे, सातारा आणि कऱ्हाड येथे केले जाईल, असा इशाराही काॅंग्रेसच्या वतीने देण्यात आलेला आहे.