सातारा : ‘साडेतीनशे वर्षांपूर्वीचा शिवकाळ काय होता, कोणत्या परिस्थितीत स्वराज्याची निर्मिती झाली. याचा नैसर्गिक अनुभव दुसऱ्या दुर्ग संमेलनाने घेतला. तुफानी पावसात १५०० फूट उंचीवर संमेलन भरवण्याचा थाट केवळ अशक्य होता. श्रीकृष्णाने गोवर्धन उचलून केलेल्या रक्षणाची अनुभूती देणारे हे दुर्ग संमेलन महाराष्ट्राचे वैभव ठरेल,’ असे प्रतिपादन संमेलनाचे स्वागताध्यक्ष प्रा. नितीन बानुगडे-पाटील यांनी केले. वर्धनगडावरील दुर्ग संमेलनाचा समारोपात रविवारी झाला. यावेळी ते बोलत होते. यावेळी उद्घाटक दुर्गमहर्षी प्रमोद मांडे, प्र. के. घाणेकर, प्रा. के. एन. देसाई, निमंत्रक दीपक प्रभावळकर, मिलिंंद क्षीरसागर, आमदार शशिकांत शिंदे, पुरातत्त्व विभागाचे प्रा. सचिन जोशी, सरपंच अर्जुन मोहिते, अजय जाधवराव, गिरीशराव जाधव उपस्थित होते.प्रा. बानुगडे-पाटील म्हणाले, ‘स्वराज्यनिर्मितीचा इतिहास केवळ अभ्यासला जातो किंवा चर्चिला जातो; मात्र या संमेलनाने तो प्रत्यक्षात अनुभवता आला. खडतर व नेटक्या संयोजनाने सजलेल्या या महोत्सवात येण्याचा मोह वरुणराजालाही आवरता आला नाही व त्याच्यावर मात करत तरुणांनी साकारलेला सोहळा इतिहासात अजरामर होईल.’प्रत्येक किल्ल्याच्या संवर्धनासाठी त्या-त्या ठिकाणी दुर्ग संवर्धक मंडळे, संस्था यांची स्थापना करण्याचा संकल्प महासंघाचे अध्यक्ष मिलिंद क्षीरसागर यांनी सोडला. समारोपात मावळ्यांकडून मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके सुरू होती. त्याचवेळी शस्त्र संग्राहक गिरीशराव जाधव प्रत्येक मर्दानी डावपेचांसह शस्त्रांची इत्थंभूत माहिती सांगत होते. शाहीर शिवकालीन वातावरणाची निर्मिती करत होते. (प्रतिनिधी)संमेलनाचे ठराव१ महाराष्ट्रातील दुर्गांच्या संवर्धनासाठी राज्य शासनाने स्वतंत्र महामंडळाची स्थापना करावी. २ महाराष्ट्राच्या प्रत्येक विभागात दुर्ग वास्तू संग्रहलाची निर्मिती करावी.३ शिवरायांच्या काही किल्ल्यांवर छायाचित्रे घेण्यास मनाई करणारी ‘फोटो बंदी’ उठवावी. ४विविध गॅझेटिअरमधील दुर्गांमधील माहिती संकलित करत शासनानेच ‘फोर्टस आॅफ महाराष्ट्र’ हे स्वतंत्र गॅझेटिअर तयार करावे.५ पश्चिम महाराष्ट्रातील प्रत्येक दुर्ग, किल्ला, गडांवर संवर्धक मंडळे निर्माण करून संवर्धनाच्या कामाला सुरुवात करावी.
इतिहासाचा अनुभव देणाऱ्या संमेलनाची सांगता
By admin | Published: November 17, 2014 10:55 PM