विभागातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून तळमावलेची ओळख आहे. शाळा, महाविद्यालय, पतसंस्था, बँका व सर्वात मोठी बाजारपेठ असल्याने विभागातील अनेक गावांतून शालेय विद्यार्थी, ग्राहकांची वर्दळ असते. येथील
बाजारपेठेत दररोज मोठी उलाढाल होत असते. परंतु कऱ्हाड - ढेबेवाडी मार्गावरील मुख्य बाजारपेठेत असलेल्या एस. टी. महामंडळाच्या पिकअप शेडची दुरवस्था झाली आहे. फरशा तुटलेल्या आहेत. खिडक्यांना दरवाजा नाही. शेडवरील पत्रा सडलेला आहे. सडलेल्या पत्र्यामुळे पावसाळ्यात तर अक्षरश: मोठ्या प्रमाणावर गळती होत असते. याठिकाणी उभे राहण्यास प्रवासी घाबरत आहेत. शेडचा कोणता भाग कधी कोसळेल, हे सांगता येत नाही. त्यामुळे जीवितहानी होऊ शकते. परिणामी, शेडचा आधार घेण्यास प्रवासी धजावत नाहीत. रस्त्यावर उभे राहून ते वाहनाची वाट पाहतात. मात्र, हा प्रकारही प्रवाशांच्या जिवावर बेतणारा
आहे.
कऱ्हाड - ढेबेवाडी मार्गाचे चौपदरीकरण झाले आहे. त्यामुळे रस्त्यावरील वर्दळ मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. तसेच वाहनांचा वेगही अमर्याद असतो. अशातच प्रवासी रस्त्यावर उभे राहिल्यास एखाद्या चालकाचा ताबा सुटून त्यांना वाहनाची धडक बसू शकते. त्यामध्येही प्रवाशांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे पिकअप शेडची लवकरात लवकर दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.