तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ओढे-नाले भरून वाहू लागले आहेत. कृष्णा-कोयना नद्यांसह उपनद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. अनेक पूल, कोल्हापूर पद्धतीचे बंधारे पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे काही गावांचा संपर्क तुटला आहे. तांबवेतील पूल गुरुवारी रात्री पाण्याखाली गेला. त्यापूर्वी किरपे ते तांबवे व तांबवे ते डेळेवाडी रस्त्यावरील पूलही पाण्याखाली गेले. त्यामुळे गाव संपर्कहीन झाले. पुराचे पाणी बाजारपेठेतून गावात शिरते. गुरुवारी सायंकाळच्या सुमारास बाजारपेठेत पाणी येऊ लागल्यामुळे व्यापाऱ्यांनी २०१९ सालच्या महापुरात झालेल्या नुकसानीचा विचार करून तातडीने दुकानातील साहित्य हलविण्यास सुरुवात केली. रात्री उशिरापर्यंत हे काम सुरू होते.
युवकांनी संबंधित व्यापारी व संस्थांना साहित्य हलवण्यासाठी मदत केली. पुराच्या पाण्यामुळे ज्या ग्रामस्थांची घरे बाधित होतात त्यांना पुराच्या धास्तीने रात्र जागून काढावी लागली. पुराच्या पाण्यात वाढ झाल्याने गावातील बाधित कुटुंबांचे दक्षिण तांबवे येथील जिल्हा परिषद शाळेत स्थलांतर करण्यात आले.
दरम्यान, शुक्रवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास तांबवे पुलावरील पाणी कमी झाले. मात्र पाण्याबरोबर आलेल्या लाकडांमुळे पुलाच्या पूर्वेकडील बाजूचे अँगल तुटून पुलाचे मोठे नुकसान झाले आहे.
फोटो : २३केआरडी०१
कॅप्शन : तांबवे, ता. कऱ्हाड येथील नवीन पुलावरील पाणी शुक्रवारी सकाळी कमी झाले. पुराच्या तडाख्याने पुलाचे मोठे नुकसान झाले आहे.