वाई : शहरातील थकीत नळकनेक्शनधारकांना कनेक्शन बंद करण्याबाबतच्या नोटिसा देण्यात आल्या आहेत. त्या अनुषंगाने नळ कनेक्शनधारकांनी मागणी केलेली देय रक्कम भरून नळ कनेक्शन बंदची कारवाई टाळली, परंतु ज्या नळ कनेक्शनधारकांनी नोटीस देऊनही पाणीकराचा भरणा केला नाही, त्याचे नळकनेक्शन बंद करण्याची कारवाई वाई नगरपरिषदेमार्फत सुरू करण्यात आली आहे. कर वसुलीबाबत मुख्याधिकारी विद्यादेवी पोळ यांनी आढावा बैठक घेऊन हे आदेश दिले. बैठकीस सहायक करनिरीक्षक व भाग लिपिक उपस्थित होते.
मुख्याधिकारी पोळ यांनी, थकीत कराबाबत जप्तीची व नळकनेक्शन बंद करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार गंगापुरी, मधली-गणपती आळी, धर्मपुरी, ब्राम्हणशाही, रामडोह आळी, रविवारपेठ भाग, सोनगिरवाडी, सिध्दनाथवाडी या भागातील थकबाकीदारांना वारंवार सूचना व नोटिसा देऊनही पाणीकराचा भरणा करण्यास टाळाटाळ केल्याने त्यांचे नळ कनेक्शन बंद करण्यात आले आहे.
वाई शहरातील नगरपालिका हद्दीतील नागरिकांनी करांचा भरणा न केल्याने सोमवार, दि. १५ मार्च २०२१ ते रविवार, दि. २८ मार्च २०२१ अखेर एकूण मिळून २३ लाख ७७ हजार रुपये इतका पाणी कर महसूल जमा झाला. तसेच यापुढेदेखील वाई शहरातील इतर थकबाकीदारांची नळकनेक्शन बंद करण्याची व जप्तीची कारवाई चालू राहणार असल्याची माहिती मुख्याधिकारी यांनी दिली आहे. तरी नागरिकांनी थकीत करांचा भरणा तात्काळ करून जप्तीची कटू कारवाई टाळवी व नगरपरिषदेस सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी यांनी केले आहे.