प्रगती जाधव-पाटील ।‘विविध ठिकाणी होणाऱ्या रिअॅलिटी शोमध्ये सातारकरांनी प्रवेश मिळविला, अंतिम फेरीपर्यंत धडकही मारली; पण जेतेपदाच्या मुकुटापर्यंत पोहोचता-पोहोचता त्यांना परतावं लागलं. पण माजगावकळ माळावरील माधुरीने स्वप्नवत वाटावं असं काम करून साताºयाच्या कलाक्षेत्रात मानाचा तुरा रोवला. राज्यातील शेकडो स्पर्धकांना मागे टाकून ‘अप्सरा आली’ या स्पर्धेतून तिनं बंदा रुपया ’असल्याचं परीक्षकांचं मत खरं केलं. सातारा ते मुंबईचा कला मंच हा माधुरीचा प्रवास, यातील मोठे अडथळे आणि सातारकर असल्याची जमेची बाजू याविषयी ती ‘लोकमत’शी दिलखुलास बोलली...!
प्रश्न : निमशहरातून महानगरांतील स्पर्धकांशी स्पर्धा कशी होती?उत्तर : महानगरांमधील मुलींना बरंच काही शिकायला मिळतं. नृत्याबरोबरच त्या स्टंटही करण्यात तरबेज होत्या. मला हे जमत नव्हतं; पण शिकण्याची तयारी होती. त्यानुसार मी शिकले. पण माझ्याकडे चेहºयावरच्या हावभावाच्या कलेने मला सर्वात सरस ठरवलं. त्या शरीराने नृत्य करायच्या आणि माझा नृत्याविष्कार दाखवायचा, आमच्यातील हाच फरक मला जेतेपदापर्यंत घेऊन गेला.
प्रश्न : या पूर्ण प्रवासात ‘सातारकर’ म्हणून काय बळ देणारं ठरलं?उत्तर : सातारकर म्हणून आपल्याकडे लढावू वृत्ती आहे. सुमारे साडेचार महिने मी बाहेरच्या जगापासून अगदी लांब होते. तिथले शेड्यूल, बारा तासांचा सराव, शूटिंग या सगळ्यात अनेकदा नैराश्य यायचं; पण सोशल मीडियाद्वारे प्रेक्षकांची येणारी पसंती, त्यांच्या कमेंटस् बरंच बळ देऊन जायच्या. सातारकर म्हणून प्रत्येकाने माझ्या पाठीशी ठाम उभं राहणं आणि प्रोत्साहन देणं हेच सातारकर असल्याचं वैशिष्ट्य असल्याचं मी मानते.
प्रश्न : नाक फ्रॅक्चर होईपर्यंतच नृत्य तल्लीनता कशामुळे?उत्तर : ‘दुर्गाई माझी, गौराई माझी’ या गाण्यावर नृत्य करताना भक्त आणि देवी अशा दुहेरी भूमिकेतून मी नृत्य करत होते. शेवटच्या दोन सेकंदात नृत्य कलेविषयी आपण देवाच्या चरणी लिन होऊन त्याचे आभार मानावेत, अशी सुप्त इच्छा जागृत झाली आणि मी त्या तल्लीनतेतच स्वत:ला देवाच्या चरणी झोकून दिलं. स्टेजवर पडले तेव्हा सर्वांना नृत्याविष्कार वाटला. नंतर मात्र नाकाला प्लास्टर करून सराव करावा लागला.गळक्या घराची लाज नाहीच !माधुरीचे वडील जोतिराम आणि आई कल्पना हे दोघेही हंगामी कामगार. कधी गवंडी म्हणून तर कधी रस्त्याच्या कामाला ते जात. डोक्यावर छत म्हणून असलेलं घर पावसाळ्यात गळायचं. या गळक्या घरात राहून माधुरीनं तिचं शिक्षण पूर्ण केलं. वडिलांबरोबर नृत्य करण्याचं तिचं पहिलं स्टेजही हे घरच होतं. त्यामुळे या घराविषयी तिला आत्मीयता वाटते. आयुष्यात कितीही मोठी झाले तरीही गळक्या घराची मला कधीच लाज वाटणार नाही, असं ती सांगते.पाया बाबा... कळस ओंकार!माधुरीच्या आयुष्यात नृत्याचा प्रवेश झाला तो वडिलांच्या रुपाने. वडिलांचे नृत्य बघून माधुरीही ते शिकत गेली. चालायला शिकलेल्या माधुरीला पायावर घेऊन ‘हस्ते हस्ते रोना सिखो, रोते रोते हसंना’ या नृत्यावर ती पहिल्यांदा बाबांबरोबर नाचली. त्यानंतर घरातच कधी तरी वडिलांबरोबर दिलखुलास नाचणं झालं. वडिलांबरोबर स्पर्धा ती गाजवू लागली. माझ्या करिअरचा पाया माझ्या बाबांनी घातला तर ते कळसापर्यंत नेण्याचं काम पती ओंकार याने केल्याचे माधुरी सांगते.