अशोक पाटील - इस्लामपूर -इस्लामपूर पालिकेच्या राजकारणात पक्षप्रतोद विजयभाऊ पाटील आणि माजी नगराध्यक्ष अॅड. चिमणभाऊ डांगे एकदिलाने कार्यरत आहेत. मात्र कृष्णा सह. साखर कारखान्याच्या निवडणुकीत विजयभाऊंचे चुलत बंधू संजय पाटील सहकार पॅनेलचे उमेदवार आहेत, तर अॅड. चिमणभाऊ गटाचे विद्यमान नगरसेवक पै. चंद्रकांत पाटील हे रयत पॅनेलमधून निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे दोन भाऊंचा नौटंकी संघर्ष सुरू झाला असून, सभासद मात्र संभ्रमात पडले आहेत.इस्लामपूर पालिकेच्या राजकारणात आमदार जयंत पाटील आणि माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी पक्ष कार्यरत आहे. पालिकेत पक्षप्रतोद विजयभाऊ पाटील, अॅड. चिमणभाऊ डांगे आणि एन. ए. गु्रपचे खंडेराव जाधव असे तीन गट कार्यरत असून, या तिघांनाही न मानणारे काही नगरसेवक आहेत. विजयभाऊ पाटील हे सहकार पॅनेलचा प्रचार करत आहेत, तर अण्णासाहेब डांगे आणि त्यांचे चिरंजीव अॅड. चिमण डांगे त्यांच्याच गटाचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांच्या पाठीशी ठाम आहेत. त्यामुळे या दोन भाऊंमध्ये तात्पुरत्या स्वरुपाचा संघर्ष निर्माण झाला आहे, तर या तिघांनाही न मानणारे नगरसेवक संस्थापक पॅनेलच्या अविनाश मोहिते यांच्या पाठीशी असल्याची चर्चा आहे.भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पाटील यांचा पूर्वी रयत पॅनेलला पाठिंबा होता. परंतु रयतने डांगे गटाच्या चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी दिली आहे. अॅड. चिमण डांगे, विक्रमभाऊ पाटील आणि बाबासाहेब सूर्यवंशी यांच्यामध्ये मोठी दरी आहे. त्यामुळे विक्रम पाटील गटाची भूमिका काय राहणार, यावरही प्रश्नचिन्ह आहे.कृष्णाच्या निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात दंड थोपटले आहेत. त्यांच्या या नौटंकी संघर्षाचा कारखान्याच्या काय परिणाम होतो, हे निकालानंतरच स्पष्ट होईल.मी आकसापोटी पत्रक काढलेले नाही. सभासद, कामगारांचे हित जपण्यासाठी माझा विरोध होता. गत निवडणुकीत माझ्याच ताकदीवर संस्थापक पॅनेल निवडून आले आहे. यावेळची उमेदवारी देण्यासाठी ते माझ्या दारात आले होते. कृष्णाच्या हितासाठी माझा उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.- महादेवराव पाटील, संचालक य. मो. कृष्णा सह. साखर कारखाना.
दोन भाऊंमध्ये नौटंकी संघर्ष, इस्लामपुरातील सभासदांच्यात संभ्रम
By admin | Published: June 16, 2015 10:01 PM