सातारा - जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांचा अवघ्या एका मताने पराभव झाला आहे. या पराभवानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयावर दगडफेक झाली आहे. राष्ट्रवादी कार्यालयावर दगडफेक करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, निवडणुकांपूर्वी दोन दिवस अगोदरही आमदार शशिकांत शिंदे आणि ज्ञानदेव रांजणे यांचे समर्थक एकमेकांमध्ये भिडले होते.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये जावळी विकास सेवा सोसायटी मतदार संघात तणावपूर्ण वातावरण असतानाच रविवारी मतदानात दिवशीच आमदार शशिकांत शिंदे आणि त्यांचे विरोधी ज्ञानदेव रांजणे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हमरीतुमरी झाली होती. यावेळी पोलिसांच्या उपस्थितीतच एकमेकांना अपशब्द वापरणे पर्यंत मजल गेली होती. मोठा अनर्थ व्हायच्या आधीच आमदार शिंदे आणि रांजणे यांनी मध्यस्थी करून समजुतदारपणा दाखवला आणि वाद मिटवला होता. त्यानंतर, निवडणूक निकालानंतर पुन्हा गोंधळ निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयावर दगडफेक करण्यात आली आहे. दरम्यान, राष्ट्रवादी समर्थकांनीच ही दगडफेक केल्याचे सांगण्यात येत आहे.
शशिकांत शिंदेंचा एका मताने पराभव
जिल्हा बँकेच्या जावळी मतदारसंघासाठी एकूण 49 मतदारांनी आपला हक्क बजावला होता. त्यापैकी शशिकांत शिंदे यांना 24 मतं मिळाली असून 25 मतं घेत रांजणेंनी विजय मिळवला आहे. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेतील 21 जागांसाठी ही निवडणूक होत असून 10 जागा बिनविरोध झाल्या आहेत. उर्वरीत 11 जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली असून पहिला निकाला हाती आला. त्यामध्ये, आमदार शशिकांत शिंदेंचा पराभव झाला आहे.