सातारा लोकसभेचा तिडा; दादांच्या इच्छेवर मिठाचा खडा
By नितीन काळेल | Published: December 11, 2023 07:33 PM2023-12-11T19:33:30+5:302023-12-11T19:34:06+5:30
महायुतीत सर्वच कंबर कसून; डाळ शिजणार कोणाची?
सातारा : लोकसभा निवडणुकीसाठी तीन महिन्यांचा अवधी असलातरी साताऱ्यात आघाडीतून राष्ट्रवादी लढणार निश्चित आहे. पण, महायुतीतील सर्वच पक्ष कंबर कसून आहेत. आधी अजित पवार यांनी नंतर शिवेसेनेने आणि आता भाजपनेही दावा ठोकलाय. त्यामुळे युतीत तिढा वाढला असून अजितदादांच्या इच्छेवर मिठाचा खडा पडला आहे. यातून कोणाची डाळ शिजणार हे निवडणुकीत समजणार आहे.
सातारा लोकसभा मतदारसंघावर पूर्वीपासून काॅंग्रेसचे वर्चस्व राहिले. १९९९ पर्यंतचा इतिहास पाहता शिवसेनेचा उमेदवार एकदाच निवडून आला. पण, याचवेळी राष्ट्रवादी काॅंग्रेसची निर्मिती झाल्यानंतर जिल्हा शरद पवार यांच्या पाठिशी ठामपणे उभा राहिला. त्यामुळे मागील पाच निवडणुकीत राष्ट्रवादीचाच खासदार झाला. पण, गेल्या चार वर्षांत जिल्ह्यातील राजकारणाला मोठी कलाटणी मिळालीय. राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याचे बुरूज ढासळले. सेनापती दुसऱ्या पक्षात गेले. तसेच काॅंग्रेसमध्येही वाताहत झाली. अनेकांनी कमळ जवळ केले. त्यामुळे भाजपची ताकद वाढली. यातूनच त्यांनी सातारा लोकसभा मतदारसंघावर पुन्हा-पुन्हा दावा ठाेकलाय. त्यामुळे महायुतीत साताऱ्याचा गुंता वाढतच चालला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्जतच्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यात सातारा लोकसभा निवडणूक लढविणार असे जाहीर केले. त्यानंतर काहीच दिवसात शिवसेनेचे (शिंदे गट) जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव यांनीही साताऱ्यावर दावा केला. तर आता भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष आणि आमदार जयकुमार गोरे यांनीही साताऱ्याची निवडणूक लढविण्याचे रणशिंग फुंकले. यामुळे युतीत तिढा निर्माण झाला आहे. अजित पवार यांना जिल्ह्यात पक्षाची ताकद असल्याने सातारा मतदारसंघ हवा आहे. त्यातच शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपची ताकदही असल्याने आपल्या उमेदवाराला निवडूण येण्यासाठी फार कष्ट घ्यावे लागणार नाहीत हेही माहीत आहे. त्यामुळे पवार यांचा दावा योग्य ठरतो.
पण, शिवसेनेला हा मतदारसंघ ताब्यात ठेवायचा आहे. युतीत पहिल्यापासून मतदारसंघ सेनेकडेच राहिलाय. आताही सेनेचे दोन आमदार मतदारसंघात आहेत. सोबत भाजपची ताकद आहे. त्यामुळे सेनेलाही मतदारसंघात बाणाला ताण द्यायचा आहे. यासाठी पुरूषोत्तम जाधव उमेदवार म्हणून दावा ठोकतील. यापूर्वीही त्यांनी लोकसभा निवडणूक लढविलेली आहे. त्यातूनच त्यांनी साताऱ्यावर आमचा हक्क असल्याचे स्पष्ट केले आहे.
भाजपची गेल्या दोन वर्षातील आक्रमक भूमिका पाहता त्यांनाही सातारा मतदारसंघ हवा आहे. भाजपने तळागाळात पक्ष नेलाय. त्यामुळे युतीत उमेदवार निवडूण येऊ शकतो असा आशावाद त्यांच्याकडे आहे. त्यातच या मतदारसंघात मागील वर्षभरात दोन केंद्रीयमंत्र्यांचा दोन-तीन दिवसांचा दाैरा झाला. ही सर्व पेरणी लोकसभा निवडणुकीसाठीच होती. त्यामुळे महायुतीत जिल्हा पातळीवरतरी सर्व काही आलबेल असल्याचे चित्र नाही. त्यामुळे याचे पडसाद आगामी काळात उमटणार निश्चित आहे. यातूनच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वप्रथम दावा केला असलातरी शिवसेना आणि भाजप माघार घेणार का ? हा कळीचा मुद्दा ठरला आहे.
आघाडी एकत्र; युतीत ताळमेळ लागणे कठीण..
महाविकास आघाडीत काॅंग्रेसने निवडणुकीची तयारी केली आहे. फुटीनंतर राष्ट्रवादी मागे होती. पण, काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी भवनमध्ये आघाडीतील तीनही पक्षांच्या नेत्यांची बैठक झाली. आघाडीत मतदारसंघ कोणाकडे अजून स्पष्ट नसताना सर्वजण एकत्र आल्याने एकी दिसून आली. पण, युतीत तिघेही जण मतदारसंघावर दावा करत आहेत. यामुळे आघाडी एकत्र आली असलीतरी युतीत ताळमेळ लागणे कठीण आहे.
..तर युतीत एकदिलाने काम नाही; माढाही चर्चेला येणार?
साताऱ्यावरुन अजित पवार हे मागे हटतील असे सध्यातरी चित्र नाही. त्यामुळे युतीत नाईलाजास्तव का असेना राष्ट्रवादीला मतदारसंघ मिळेल. यामध्ये भाजपचे कार्यकर्ते केंद्रात सत्ता आणायची म्हणून राष्ट्रवादीच्या उमेदवाराचे काम करतील. पण, नाराज शिवसेना कितपत साथ देईल, याविषयी साशंकता राहू शकते. तसेच अजित पवार यांच्या ताब्यातून सातारा निसटला तर माढ्यावर नक्कीच त्यांचा दावा असणाार आहे. याठिकाणी भाजप आणि राष्ट्रवादीचीच ताकद आहे. सेनेसाठी माढा फायद्याचा नाही.