प्रमोद सुकरे
कराड
शिवाजी विद्यापीठाच्या हिवाळी सत्रातील बीकॉम भाग 3 च्या परीक्षा गुरुवारपासून सुरू झाल्या आहेत. कोरोनाच्या महामारी संकटामुळे या परीक्षा ऑनलाइन व ऑफलाइन घेतल्या जाणार आहेत. गुरुवारी ऑनलाइन परीक्षा सुरू झाली. मात्र, परीक्षार्थींना मदतीसाठी दिलेले हेल्पलाइन नंबरच हेल्पलेस ठरत असल्याने विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला. परिणामी, त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न विचारला जात आहे.
कोरोनाच्या महामारी संकटामुळे शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरने ऑनलाइन व ऑफलाइन परीक्षा असे दोन्ही पर्याय ठेवले आहेत. पैकी एक विद्यार्थ्यांना निवडायचा आहे. ऑनलाइन परीक्षेचे वेळापत्रक काही दिवसांपूर्वीच विद्यापीठाने जाहीर केले आहे. तर परवानगी मिळाल्यावर ऑफलाइन परीक्षा घेतल्या जाणार आहेत.
गुरुवारपासून बीकॉम भाग तीन या वर्गाच्या ऑनलाइन परीक्षांना सुरुवात झाली. परीक्षार्थींना विद्यापीठांनी लॉगइन आयडी आणि पासवर्ड पाठवून दिले आहेत. परीक्षा देताना परीक्षार्थीला काही अडचण निर्माण झाल्यास त्यांच्या मदतीसाठी विद्यापीठाने हेल्पलाइन नंबर दिले आहेत.
प्रत्यक्ष परीक्षेवेळी परीक्षार्थींना लॉगइन करताना अडचणी आल्या. त्यांना आपला पासवर्ड चुकला आहे का, अशी शंका आली. मग विद्यार्थ्यांनी हेल्पलाइन नंबरला फोन करायला सुरुवात केली. विद्यापीठाने दिलेल्या पाच नंबरपैकी पहिले तीन नंबर तर लागतच नव्हते. असा अनुभव अनेक विद्यार्थ्यांना आला. तर उरलेले दोन नंबर लागत होते; पण सतत व्यस्त होते. त्यामुळे विद्यार्थ्यांचा वेळ वाया गेला.
शेवटच्या वर्षाची परीक्षा ही महत्त्वाची परीक्षा आहे. परीक्षेसाठी दिलेल्या वेळेतील प्रत्येक मिनीट महत्त्वाचा आहे. मात्र, लॉगइन करताना अडचणी आल्याने विद्यार्थ्यांच्या मनात अनेक शंका आल्या. त्यासाठी त्यांनी हेल्पलाइन म्हणून दिलेले 82 91 98 92 98; 77 0 0 90 70 79; 86 57 74 61 86 या तीन नंबरवर फोन केले. ते लागतच नसल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. तर 93 70 51 18 46 व 93 70 51 18 47 हे नंबर सतत व्यस्त लागत होते. त्यामुळे येथून प्रतिसाद मिळेपर्यंत परीक्षार्थींचा बराच वेळ वाया गेला. शैक्षणिक नुकसान झाले. त्याला जबाबदार कोण, हा प्रश्न आहे.
चौकट
म्हणे परीक्षा रद्द झाली आहे...
विद्यापीठाने संपर्कासाठी काही दूरध्वनी नंबर ही दिले होते. काही परीक्षार्थींनी शंका दूर करण्यासाठी त्यावर फोन केले. ते फोन कोणी घेतच नसल्याचा अनुभव अनेकांना आला. काही ठिकाणी फोन उचलला गेला; पण समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत. एका विद्यार्थिनीला तर दूरध्वनी घेणाऱ्या व्यक्तीने विद्यापीठाचे कामकाज सध्या बंद आहे. परीक्षा रद्द झाल्या आहेत असे उत्तर दिले आहे.
कोट
ऑनलाइन परीक्षा देताना विद्यार्थ्यांना काही
तांत्रिक अडचणी येत आहेत. त्यासाठी विद्यापीठाने हेल्पलाइन नंबर दिले आहेत; पण ते कार्यरत नसल्याचे विद्यार्थी सांगतात. याबाबतच्या तक्रारी विद्यार्थ्यांनी आमच्याकडे केल्यानंतर आम्हीसुद्धा या नंबरवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला; पण ते नंबर बंद असल्याचे किंवा उचलत नसल्याचे निदर्शनास आले.
-प्रा. अमेय देसाई,
आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय, मेढा.