सातारा : जबरी चोरीच्या गुन्ह्यातील फरार महिला आरोपीला तीन वर्षांनी अटक झाल्यानंतर तिच्या नातेवाइकांनी बुधवारी रात्री शहर पोलीस ठाण्यासमोर धिंगाणा घातला. पोलिसांना शिवीगाळ आणि लॉकअपच्या आवाराचे मुख्य फाटक उघडण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबतची हकिकत अशी की, सिंधू प्रकाश नलवडे (वय ४५, रा. मंगळवार पेठ) हिच्याविरुद्ध २०१२ मध्ये जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून फरार असलेल्या सिंधूला बुधवारी अटक करण्यात आली. जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करून तिला पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले. सिंधूचे नातेवाईक असलेले स्त्री-पुरुष रात्री पोलीस ठाण्यासमोर मोठ्या संख्येने जमले आणि ‘सिंधूला सोडून द्या,’ असे म्हणू लागले. नंतर काही पोलीस कर्मचारी शहर पोलीस ठाण्याशेजारी असलेल्या कोठडीच्या बाहेरील वऱ्हांड्यात सिंधूला घेऊन गेले. पाच ते दहा मिनिटांतच कोठडीच्या मुख्य फाटकाजवळूनमहिलांचा आरडाओरडा ऐकू येऊ लागला.पोलीस उपनिरीक्षक आवळे आणि इतर कर्मचाऱ्यांनी जाऊन पाहिले असता, सिंधूचे नातेवाईक आरडाओरडा करीत होते. फाटकाजवळ आलेल्या पोलिसांना ते अरेरावी आणि शिवीगाळ करीत होते. दरम्यान, एकाने फाटक उघडण्याचा प्रयत्न केला असता, पोलिसांनी त्याला पकडले आणि जमाव नियंत्रणात आणण्यासाठी जादा कुमक मागविण्यात आली.ताब्यात घेतलेल्या प्रकाश रामचंद्र नलवडे (वय ५३, रा. मंगळवार पेठ) याला पोलिसांनी जमाव पांगल्यानंतर कोठडी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज दाखविले आणि धिंगाण्यात सहभागी असलेल्यांची नावे विचारून गुन्हे दाखल केले. प्रकाश नलवडे यांच्यासह शशिकला हणमंत पुजारी, शीतल संतोष पवार, सुंदरा राजाराम पवार, संदीप प्रकाश नलवडे, नीता प्रकाश पवार, शीतल प्रकाश नलवडे आणि सविता मोहिते (सर्व रा. मंगळवार पेठ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस नाईक नीलम सूर्यवंशी यांनी फिर्याद दाखल केली आहे. (प्रतिनिधी)जलद कृती दलास पाचारणसायंकाळपासून पोलीस ठाण्याजवळ काही महिला जमा झाल्या होत्या. रात्री आरोपी सिंधूला कोठडीकडे नेईपर्यंत आणखी बराच मोठा जमाव तेथे आला होता. तसेच जमावातील व्यक्तींच्या प्रतिक्रियाही तीव्र झाल्या होत्या. पोलिसांची जादा कुमक कोठडीजवळ बोलावली. शिवाय जलद कृती दलाचे जवानही पोलीस ठाणे आणि कोठडी परिसरात तैनात करण्यात आले होते.
आरोपीच्या नातेवाइकांचा गोंधळ
By admin | Published: July 10, 2015 12:44 AM