सातारा : पंतप्रधान व सरकारने मिळून सुप्रीम कोर्टाला ताब्यात घेण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. संविधान बदलण्याचा ठराव राज्यसभेत मांडला गेला, त्याला काँग्रेस पाठिंबा दिला. भाजपा आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष मिळून देशात अस्थिर परिस्थिती निर्माण करत आहेत, असा आरोप भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत केला. ते म्हणाले, ‘काँग्रेस केवळ सांख्यिकी राजकारण खेळत आहे. अनुसूचित जाती व जमातीची यादी कमी करण्याचे काम १९६० मध्ये झाले. त्याला तेव्हाच्या सरकारने विरोध केला नाही. आता राज्यातील अलुतेदार व बलुतेदार एकत्र येऊन सरकार स्थापन करून आपला हक्क मिळवतील. आता कुणापुढेही हात पसरायला आम्ही जाणार नाही. २० मे रोजी सायंकाळी चार वाजता सत्ता संपादन परिषद होणार असून, पुढील लढ्याची दिशा ठरवली जाणार आहे, असे आंबेडकर यांनी स्पष्ट केले. जाती-जातीत दंगल घडवून आणण्याचे डाव सरकार खेळत आहे. धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळण्याचा लढा वर्षानुवर्षे सुरू आहे. त्यांच्यासोबतच राज्यातील ३३ इतर जमातींचे प्रश्नही सुटलेले नाहीत. अटलबिहारी वाजपेयी यांनी सोलापुरात या समाजाचे प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील निवडणुकीत हा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, ते पाळले नाही. २०१९ च्या निवडणुका तोंडावर असतानाही हा प्रश्न सुटलेला नाही. उलट धनगर-लिंगायत वाद पेटवण्याचे उद्योग भाजपच्या मंत्र्यांनी सुरू केले आहेत.
आम्ही कोणाच्या वाटेतील मांजर होणार नाही भाजपला रोखण्यासाठी आपण भूमिका घेत आहात, असा आरोप होत असतो, असे पत्रकारांनी विचारल्यावर आंबेडकर म्हणाले, ‘आम्ही कुणाच्याही वाटेतील मांजर होणार नाही.’
पंतप्रधानांच्या सूचनेमुळे भिडेंची अटक थांबली संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर एकच आरोप आहेत. एकबोटे यांना अटक झाली. मात्र, भिडे यांना अटक होत नाही, कारण त्यांना अटक करू नये, अशी खुद्द पंतप्रधान यांच्या सूचना आहेत.
शरद पवारांना न भेटताच आंबेडकर निघून गेलेसाताऱ्यातील शासकीय विश्रामगृहावर पत्रकार परिषद सुरू असताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार विश्रामगृहावर दाखल झाले. विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, माजी आमदार प्रभाकर घार्गे हे त्यांच्यासोबत होते. पत्रकार परिषदेनंतर आंबेडकर पवारांना भेटतील, अशी शक्यता होती. परंतु पवारांना न भेटताच आंबेडकर बाहेर पडले.