काँग्रेसचा पुण्यावर दावा; सांगली, सोलापूरही लढविण्याची तयारी - सोनलबेन पटेल 

By नितीन काळेल | Published: February 29, 2024 07:03 PM2024-02-29T19:03:11+5:302024-02-29T19:03:37+5:30

हातकणंगेत राजू शेट्टींबद्दल चर्चा; साताऱ्यात तीन जिल्ह्यातील पदाधिकारी बैठक 

Congress claims Pune; Preparing to contest elections in Sangli, Solapur as well, Official meeting was held in Satara | काँग्रेसचा पुण्यावर दावा; सांगली, सोलापूरही लढविण्याची तयारी - सोनलबेन पटेल 

काँग्रेसचा पुण्यावर दावा; सांगली, सोलापूरही लढविण्याची तयारी - सोनलबेन पटेल 

सातारा : लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे तीन पक्ष एकत्र येऊन काम करत आहेत. पुण्यावर काँग्रेसचा दावा असून सांगली आणि सोलापूर मतदारसंघही लढविण्याची तयारी आहे, अशी माहिती अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सचिव सोनलबेन पटेल यांनी दिली. त्याचबरोबर राजू शेट्टी आमच्याबरोबर आल्यास हातकणंगले मतदारसंघ त्यांना देण्याबाबत चर्चा सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

येथील जिल्हा काँग्रेस कमिटीत आयोजित पत्रकार परिषदेत सोनलबेन पटेल बोलत होत्या. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ प्रभारी निरीक्षक आणि तालुकाध्यक्षांच्या बैठकीसाठी त्या आल्या होत्या. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डाॅ. सुरेश जाधव, जिल्हा प्रभारी श्रीरंग चव्हाण-पाटील, सरचिटणीस नरेश देसाई, राजेंद्र शेलार आदी उपस्थित होते. दरम्यान, या पत्रकार परिषदेत पटेल यांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तरेही दिली.

काॅंग्रेसच्या सचिव पटेल म्हणाल्या, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. शुक्रवारी पुण्यात इतर तीन जिल्ह्यांची बैठक होत आहे. निवडणुकीत काय काम करायचे, कशी रणनिती आखायची याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत. काँग्रेसने वाॅर रुम तयार केली आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीतील प्रमुख तीन पक्ष एकत्र येऊन लढणार आहेत. आघाडीतून जे उमेदवार असतीत त्यांना विजयी करु. त्याचबरोबर सध्या काँग्रेसला वातावरण चांगले आहे. आमचा पुणे लोकसभा मतदारसंघावर दावा आहे. तर सांगली आणि सोलापूर मतदारसंघातही काँग्रेसचा उमेदवार असणार आहे.

सातारा लोकसभा मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री पृश्वीराज चव्हाण यांच्या नावाची चर्चा आहे. काँग्रेस मतदारसंघ मागणार का ? असा प्रश्न पत्रकारांनी केल्यावर पटेल यांनी पृश्वीराज चव्हाण हे महाराष्ट्राचे नेते आहेत. त्यांचे कोठेही स्वागतच होईल. आजच्या बैठकीत सातारा मतदारसंघाची मागणी झाली नाही. पण, पुण्यातील बैठकीत सातारा मतदारसंघ काँग्रेसकडे घेण्याबाबत आणि पृश्वीराज चव्हाण यांच्या उमेदवारीबाबत चर्चा झाली होती असे त्यांनी सांगितले. तर काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण भाजपात गेल्याच्या प्रश्नावर त्यांनी दबावातूनच राजकीय नेते भाजपात जातात. सध्या दबावाचेच राजकारण सुरू आहे. ही लोकशाही संपविण्याचे काम सुरू आहे. पण, भाजपमध्ये जाणाऱ्यांचे हालच होतात, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पश्चिम महाराष्ट्रातील हातकणंगले आणि माढा लोकसभा मतदारसंघाच्या प्रश्नावर पटेल यांनी माढ्याबाबत आमचा विचार नाही. पण, हातकणंगले मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी आहेत. ते महाविकास आघाडीबरोबर आल्यास त्यांना जागा सुटू शकते असे सांगतले. तर गुजरातमध्ये भाजपला चांगले यश मिळेल असे सांगण्यात येते, याबद्दल आपले मत काय ? पत्रकारांच्या या प्रश्नावर त्यांनी मी गुजरातची आहे. तेथे बोगस मतदान होते. गुजरात ही भाजपची प्रयोगशाळा आहे. तेथे प्रयोगच होतात, असेही ठामपणे सांगितले.

कोल्हापूरच्या जागेबाबत चर्चा..

साताऱ्यात तीन जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी बैठक झाली. या बैठकीत लोकसभा मतदारसंघाची तयारी आणि आढावा घेण्यात आला आहे, असे सोनलबेन पटेल यांनी पत्रकारांना सांगितले. त्याचबरोबर कोल्हापूरची जागा काँग्रेस लढविणार आहे का ? असा प्रश्न पत्रकारांनी केल्यावर त्यांनी कोल्हापूरबाबत चर्चा सुरू आहे, एेवढेच उत्तर दिले.

Web Title: Congress claims Pune; Preparing to contest elections in Sangli, Solapur as well, Official meeting was held in Satara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.