काँग्रेसच्या दुष्काळ पाहणी समितीची उद्या कराडमध्ये बैठक, पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेसचे सर्व आमदार उपस्थित राहणार
By प्रमोद सुकरे | Published: June 1, 2024 01:41 PM2024-06-01T13:41:05+5:302024-06-01T13:42:18+5:30
पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीत घेणार आढावा
कराड : वाढत्या दुष्काळाची दाहकता लक्षात घेता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने विभागवार "दुष्काळ पाहणी समिती" गठीत केली आहे. पश्चिम महाराष्ट्र विभागाच्या समिती प्रमुखपदी माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांना जबाबदारी दिली असून या समितीची नियोजन बैठक रविवारी दि. २ जून रोजी दुपारी १२ वाजता शासकीय विश्रामगृह, कराड येथे आयोजित केली आहे. या बैठकीस समितीमधील सदस्य व पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेसचे सर्व आमदार उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती प्रसिध्दी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.
पत्रकात म्हटले आहे की, संपूर्ण महाराष्ट्र भीषण दुष्काळात होरपळत असून पिण्याचे पाणी आणि चाऱ्याची प्रचंड मोठी टंचाई निर्माण झाली आहे. भयंकर परिस्थिती असताना सरकारकडून कोणतीही उपाययोजना केली जात नाही. पाण्याचे टँकर, रोजगार हमीची कामे, चारा छावण्या अद्याप सुरु नाहीत. सरकारला या परिस्थितीचे गांभीर्यही नाही यामुळे विरोधी पक्ष नात्याने सरकारला दुष्काळ प्रश्नांवर गांभीर्याने विचार करण्यासाठी प्रदेश काँग्रेसने विभागवार समिती गठीत केली आहे. यानुसार पश्चिम महाराष्ट्र विभागाच्या समिती प्रमुख पदाची जबाबदारी राज्याचे माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
दुष्काळ पाहणी समितीमध्ये १३ सदस्य आहेत. यामध्ये आमदार सतेज पाटील, विश्वजित कदम, प्रणिती शिंदे, संग्राम थोपटे, संजय जगताप, विक्रमसिंह सावंत, जयश्री जाधव, ऋतुराज पाटील, राजू आवळे, रवींद्र धंगेकर, जयंत आसगावकर तसेच प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस संजय बालगुडे या समितीचे समन्वयक असणार आहेत. तसेच या समितीमध्ये विशेष निमंत्रित म्हणून या जिल्ह्यातील सर्व जिल्हाध्यक्ष यांची सुद्धा नियुक्ती करण्यात आली आहे.