गुजरात निवडणुकीत काँग्रेसने पृथ्वीराज चव्हाणांकडे दिली मोठी जबाबदारी, महत्वाच्या पाच नेत्यांमध्ये समावेश

By प्रमोद सुकरे | Published: November 14, 2022 06:40 PM2022-11-14T18:40:18+5:302022-11-14T18:41:17+5:30

यावेळच्या निवडणुकीत सुद्धा काँग्रेसने कंबर कसली असून गुजरात राज्याच्या पाच विभागाची जबाबदारी महत्वाच्या पाच नेत्यांवर सोपविली आहे.

Congress gave a big responsibility to Prithviraj Chavan In the Gujarat elections | गुजरात निवडणुकीत काँग्रेसने पृथ्वीराज चव्हाणांकडे दिली मोठी जबाबदारी, महत्वाच्या पाच नेत्यांमध्ये समावेश

संग्रहित फोटो

Next

कराड : गुजरात निवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेस कडून माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांना प्रचाराची जबाबदारी देण्यात आली आहे. यामध्ये त्यांना बडोदा व अहमदाबाद या विभागाचे निरीक्षक म्हणून जबाबदारी पक्ष नेतृत्वाने सोपविली आहे अशी माहिती त्यांच्या संपर्क कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

पत्रकात म्हटले आहे की, पृथ्वीराज चव्हाण गुजरातमधील अहमदाबाद दौऱ्यावर पुढील ४ दिवस असणार आहेत. येथे ते राज्य व जिल्हानिहाय पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी बैठक घेऊन संवाद साधणार आहेत. तसेच या ठिकाणी पृथ्वीराज चव्हाण यांच्या पत्रकार परिषदा सुद्धा होणार आहेत. चव्हाण यांनी भारताचे पहिले पंतप्रधान दिवंगत पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त गुजरात प्रदेश काँग्रेस कमिटीच्या मुख्यालयात आदरांजली अर्पण केली.

गुजरात निवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेसने प्रचाराची रणनीती आखली असून मागील निवडणुकीत सत्ताधारी भाजपला चांगलीच टक्कर दिली होती. यावेळच्या निवडणुकीत सुद्धा काँग्रेसने कंबर कसली असून गुजरात राज्याच्या पाच विभागाची जबाबदारी महत्वाच्या पाच नेत्यांवर सोपविली आहे. त्यानुसार महाराष्ट्रातून माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण आणि खासदार मुकुल वासनिक यांच्यावर जबाबदारी सोपविली आहे.

गुजरात काँग्रेस पक्षाचे प्रभारी म्हणून पृथ्वीराज चव्हाण यांनी उत्तमरित्या जबाबदारी याआधी निभावली आहे. त्यांच्या कार्यकाळात काँग्रेसने २००४ साली गुजरात मध्ये १२ खासदार निवडून आणले आहेत. त्याच वर्षी या निर्णायक गुजरात च्या खासदारांच्या संख्येमुळे काँग्रेस हा लोकसभेत १ नंबर चा पक्ष ठरला होता आणि काँग्रेस पक्ष मित्र पक्षांच्या साहाय्याने सत्तेवर आला होता. हि महत्वाची घटना काँग्रेस मुख्यालयात नोंद असल्याने यावर्षीच्या गुजरात निवडणुकीसाठी काँग्रेस अध्यक्षांनी पृथ्वीराज चव्हाण यांना प्रमुख विभागांची जबाबदारी दिलेली आहे.असेही पत्रकात म्हटले आहे

Web Title: Congress gave a big responsibility to Prithviraj Chavan In the Gujarat elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.