लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : कॉँगे्रसच्यावतीने राज्यात सुरू झालेल्या ‘आक्रोश मेळाव्या’ची सांगता येत्या ८ नोव्हेंबरला सांगलीत होणार आहे. पश्चिम महाराष्टÑाचा हा मेळावा होणार असल्याने याच्या नियोजनासाठी आयोजित बैठकीत प्रदीर्घ कालावधिनंतर कॉँग्रेसचे सर्व नेते एकवटले. गटा-तटात विस्कळीत झालेली कॉँग्रेस यापुढेही एकसंध दिसेल, असे मत आ. पतंगराव कदम यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.येथील आमराई क्लबच्या सभागृहात कॉँग्रेसचे पश्चिम महाराष्टÑातील नेते, जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्ते यांची बैठक मंगळवारी पार पडली. या बैठकीत मेळाव्याचे प्रमुख निमंत्रक आ. पतंगराव कदम यांनी मार्गदर्शन केले. यावेळी माजी मंत्री सतेज पाटील, आ. जयकुमार गोरे, आ. आनंदराव पाटील, आ. मोहनराव कदम, कोल्हापूरचे माजी आमदार पी. एन. पाटील, हाफिज धत्तुरे, उमाजी सनमडीकर, युवक प्रदेश कॉँग्रेसचे अध्यक्ष विश्वजित कदम, प्रदेश सरचिटणीस प्रकाश येलगुलवार, प्रकाश सातपुते, प्रदेश चिटणीस तौफिक मुलाणी, महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा शैलजाभाभी पाटील, जयश्रीताई पाटील, सोलापूरचे पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील, कोल्हापूर शहर जिल्हाध्यक्ष प्रल्हाद चव्हाण आदी उपस्थित होते.मेळाव्यानंतर पत्रकारांशी बोलताना कदम म्हणाले की, येत्या ८ नोव्हेंबर रोजी सांगलीच्या नेमिनाथनगर येथील कल्पद्रुम क्रीडांगणावर दुपारी १ वाजता मेळावा होणार आहे. मराठवाडा, विदर्भ आणि कोकणचा दौरा करून राज्यातील व केंद्रातील प्रमुख नेते सांगलीतील आक्रोश मेळाव्यास उपस्थित राहणार आहेत. राज्यातील भाजप सरकारला तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. केंद्र व राज्यातील सरकारने अनेक फसवे निर्णय घेतले. अर्थव्यवस्था अडचणीत आणण्याबरोबरच सामान्य माणसाचे जगणे अधिक कठीण करण्यास ते कारणीभूत ठरले आहेत. नोटाबंदी, जीएसटी आणि कर्जमाफी अशाप्रकारचे निर्णय सरकारच्या अकार्यक्षमतेचे दाखले आहेत. त्यामुळे जनतेत असलेला असंतोष आता व्यक्त होत आहे.राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत जनतेने पुन्हा कॉँग्रेसवर विश्वास व्यक्त केला आहे. जिल्ह्यातही कॉँग्रेस क्रमांक एकवरच आहे. जिल्हा परिषदेतील भाजपचा विजय हा एक अपघात होता. यापुढेही प्रत्येक निवडणुकीत कॉँग्रेसला जनतेचे पाठबळ मिळेल. जनतेच्या प्रश्नावर सातत्याने जिल्ह्यातील कॉँग्रेसची आंदोलने सुरूच आहेत. यापुढेही वर्षभर आंदोलनांच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न कॉँग्रेस मांडणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.सतेज पाटील म्हणाले की, मेळावा झाल्यानंतरही आमच्याकडे वर्षभराचा अजेंडा प्रदेश कार्यकारिणीने दिला आहे. त्याप्रमाणे आम्ही जनतेच्या प्रश्नांसाठी शासनाशी संघर्ष करीत राहू.न येणारे फेकले जातील : कदमकॉँग्रेसच्या सर्व नेत्यांना आता एकत्र आलेच पाहिजे. पक्षाची ताकद प्रत्येक आंदोलनात यापुढे दिसून येईल. त्यामुळे जे आमच्यासोबत येतील ते राहतील, न येणारे बाहेर फेकले जातील, असा इशारा पतंगराव कदम यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.
मेळाव्याच्या निमित्ताने कॉँग्रेस नेते एकवटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 01, 2017 12:44 AM