लोकमत न्यूज नेटवर्ककोरेगाव : काँग्रेसमधील पक्षांतर्गत निवडीच्या अनुषंगाने कोरेगावात शनिवारी झालेल्या बैठकीत भर व्यासपीठावर नेतेमंडळींना धक्काबुकी करण्यात आली. निरीक्षकांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांमधील मतभेद अक्षरश: चव्हाट्यावर आले. दरम्यान, तालुकाध्यक्ष निवडीचे सर्वाधिकार माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना देण्याचा ठराव जिल्हा परिषद सदस्य भीमराव पाटील यांनी मांडला आणि त्यास किरण बर्गे यांनी अनुमोदन दिले.प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने पक्षातील संघटनात्मक पदांच्या निवडीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून, कोरेगाव तालुक्याची बैठक शनिवारी बोलविण्यात आली होती.
या बैठकीची पूर्वकल्पना तालुकाध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य अथवा पदाधिकाºयांना देण्यात आलेली नव्हती. याबाबतची माहिती मिळताच तालुकाध्यक्ष किशोर बाचल, जिल्हा परिषद सदस्य भीमराव पाटील व जिल्हा परिषदेचे माजी सदस्य किरण बर्गे हे कार्यकर्त्यांसमवेत बैठकीच्या ठिकाणी गेले. तेथे जिल्हा काँग्रेस कमिटीचे काही पदाधिकारी व कार्यकर्ते अगोदरच उपस्थित होते.
बैठकीच्या आयोजनावरून कार्यकर्त्यांमध्ये दोन गट तयार झाले होते. त्यांच्यामध्ये शाब्दिक चकमकी झडत असतानाच बैठकीस सुरुवात करण्यात आली. निरीक्षक विठ्ठल खराडे यांचा सत्कार करण्यासाठी किशोर बाचल उभे राहिले असतानाच जिल्हा कार्याध्यक्ष अॅड. विजयराव कणसे हे देखील उठले, त्याचवेळी कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल सुरू झाली. व्यासपीठावरील नेतेमंडळींना कार्यकर्त्यांनी धक्काबुकी केली. अखेरीस बाचल यांनी खराडे यांचा सत्कार करून बैठकीच्या कामकाजास सुरुवात केली.
पृथ्वीराज चव्हाण यांनी मला तालुकाध्यक्षपदी काम करण्याची संधी दिली, त्या संधीचे सोने करत आम्ही नगरपंचायत, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांना सामोरे गेलो; मात्र काही लोकांनी चुकीची भूमिका घेतल्याने पक्षाला पराभवाला सामोरे जावे लागले. काँग्रेस हा विचारधारा जपणारा पक्ष असून, पक्षात शिष्टाचार पाळला जातो, याची बैठक बोलविणाºयांना माहिती नाही का ? तालुकाध्यक्षांना माहिती न होता, परस्पररीत्या बैठक बोलविण्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.
भीमराव पाटील यांनी जिल्हाध्यक्ष आमदार आनंदराव पाटील यांच्या कार्यपद्धतीवर टीका केली. जिल्हाध्यक्षांची तक्रार केंद्रीय निरीक्षक शकील अहमद, प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण व पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे केली असल्याचे सांगितले. वेगवेगळ्या पद्धतीने बैठका घेऊन चुकीच्या लोकांच्या हाती पक्षाची सूत्रे देण्याचा प्रयत्न आम्ही हाणून पाडणार आहोत. जिल्ह्यात अन्यत्र केलेले चुकीचे प्रकार आम्ही कोरेगावात सहन करणार नाही, असा इशारा दिला.
अॅड. जयवंतराव केंजळे यांनी पक्षाच्या विचारधारेचे महत्त्व विषद केले. शिवसेना, भाजप व राष्टÑवादी हे विरोधी पक्ष असून, त्यांच्या विरोधात लढण्यासाठी आपण एकत्रित आले पाहिजे,’ असे मत त्यांनी मांडले. बैठकीच्या शेवटी तालुकाध्यक्ष निवडीचे सर्वाधिकारपृथ्वीराज चव्हाण यांना देण्याचा ठराव भीमराव पाटील यांनी मांडला आणि त्यास किरण बर्गे यांनी अनुमोदन दिले. बैठकीनंतर निरीक्षक व पदाधिकारी चालतच पक्ष कार्यालयात गेले.निरीक्षकांसमोर वाचला तक्रारींचा पाढाकाँग्रेसच्या तालुका कार्यालयात निरीक्षक विठ्ठल खराडे, जिल्हा प्रतिनिधी आर. टी. स्वामी, अशोक पाटील, सतीश भोसले यांच्यासमोर ग्रामीण भागातून आलेल्या युवा व वयोवृद्ध कार्यकर्त्यांनी तक्रारींचा पाढा वाचला.नुकत्याच झालेल्या नगरपंचायत, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत कोणी-कोणी पक्षविरोधी कारवाया केल्या, त्यांची कार्यपद्धती यावर सर्वांचा भर होता. निरीक्षकांनी त्यांना भावनांची दखल घेतली जाणार असून, उद्याच पृथ्वीराज चव्हाण यांना सर्वंकष अहवाल सादर करणार असल्याचे स्पष्ट केले.