कऱ्हाड (जि. सातारा) : राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस, उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि डाव्या पक्षांनी एकत्रित निवडणुकीला सामोरे जाण्याची गरज आहे. तसा विचार आमच्या मनात आहे. मात्र, प्रत्यक्षात तशी चर्चा अद्याप झालेली नाही. येत्या काळात त्याबाबत चर्चा होईल, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी दिली.
कऱ्हाड येथे आयोजित पत्रकार परिषदेत पवार म्हणाले, केंद्र सरकारकडून तपास यंत्रणांचा गैरवापर होतोय. या यंत्रणांच्या माध्यमातून विरोधकांवर दबाव आणण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. ही बाब लोकशाहीला धरून नाही. मनीष सिसोदिया यांच्यावर झालेली कारवाई हा त्याचाच एक भाग आहे. आठ राज्यांत वेगवेगळ्या नेत्यांवर अशा पद्धतीने कारवाई झाली. ज्यांच्यावर अशी कारवाई झाली त्या नेत्यांची यादी पंतप्रधानांना पत्राद्वारे पाठविली आहे. या यादीतील अनेक नेते असे आहेत की, त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्यावरील कारवाई काढून घेण्यात आली. नागालॅण्ड आणि मेघालयमध्ये राष्ट्रवादीने निवडणुका लढविल्या. मात्र, नागालॅण्डमध्ये अधिक लक्ष घातले. त्या ठिकाणी आम्हाला सात जागा मिळून विरोधी पक्ष म्हणून स्थान मिळाले. इतर राज्यांत असेच लक्ष दिले तर चित्र निश्चितच बदललेले दिसेल, असा विश्वासही पवार यांनी व्यक्त केला.
त्यावेळी ते देशद्रोही नव्हते का?
- नवाब मलिक यांच्याविषयीचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. मात्र, असे असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांना देशद्रोही कसे म्हणू शकतात? एकाच मंत्रिमंडळात ते दोघेही सहकारी मंत्री
- होते, त्यावेळी ते देशद्रोही नव्हते का? असा प्रश्न पवार यांनी उपस्थित केला.
नाफेडने कांदा खरेदी करावा! कांदा उत्पादक शेतकरी सध्या मोठ्या संकटात सापडले आहेत. या शेतकऱ्यांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. नाफेडने मोठ्या प्रमाणावर कांदा खरेदी करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणीही पवार यांनी केली.