कऱ्हाड : ‘काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने धनगर समाजाला लाथाडण्याचे काम केले आहे. धनगर समाजाला आरक्षण मिळावे, ही त्यांच्यापैकी कोणाचीही इच्छा नव्हती; अगदी शरद पवारांचाही त्याला विरोध होता,’ असा आरोप राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी केला.कऱ्हाड दक्षिणचे उमेदवार डॉ. अतुल भोसले यांच्या प्रचारार्थ वडगाव हवेली येथील सप्तपदी मंगल कार्यालयात आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. ‘डॉ. अतुल भोसले यांच्या रूपाने कऱ्हाड दक्षिणेतून मुंबईला कमळ पाठवा, त्यांना कॅबिनेट मंत्रिपद नक्की मिळेल,’ असा विश्वासही जानकर यांनी व्यक्त केला.डॉ. अतुल भोसले, राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष मारुती जानकर, उपजिल्हाध्यक्ष सदानंद माने, रेठरे बुद्रुकच्या सरपंच प्रमिलाताई हिवरे, माजी पंचायत समिती सदस्या सुजाता गोरे, वडगाव हवेलीचे सरपंच शंकरराव ठावरे, आनंदराव हिवरे, महेश कचरे, अप्पासाहेब खरात, सातारा जिल्हा गोंधळी समाज विकास संस्थेचे सुनील गायकवाड, रामोशी समाज संघटनेचे आनंदराव जाधव, विठ्ठल ठावरे, हैबती येडगे, नितीन गावडे आदी उपस्थित होते.ङ्कमहादेव जानकर म्हणाले, ‘धनगर समाज आरक्षणासाठी रस्त्यावर उतरला असताना त्यांच्याकडे डोळेझाक करणाऱ्या आणि स्वत:च्या पक्षातील आमदारांना घाबरून धनगरांना आरक्षण देण्यासाठी शंभर टक्के विरोध करणाऱ्या माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना कऱ्हाड दक्षिण मतदार संघातून पराभूत करा. कालच झालेल्या इगतपुरीच्या सभेत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कुठल्याही जातीला संधी देणार नसल्याचे वक्तव्य केले आहे. त्यामुळे अशा नेत्यांना बाजुला सारून राज्यात भाजप आणि मित्रपक्षांचे शासन सत्तेवर आणा.स्वच्छ चारित्र्याचा डांगोरा पिटणाऱ्या माजी मुख्यमंत्र्यांनी घोटाळे करणाऱ्यांना गजाआड का केले नाही?, राज्यातील लोडशेडिंग, शेतकऱ्यांच्या आत्महत्येला पृथ्वीराज चव्हाण, शरद पवार जबाबदार असून, आता अतुल भोसलेंच्या पाठीशी राहा. मग पुढच्या लोकसभा निवडणुकीत शरद पवारांच्या मुलीला पराभूत करून मी खासदार म्हणूनच तुमच्या समोर येईन.’ यावेळी हणमंत गावडे, संभाजी हुलवान, मनोज गडाळे, आबासाहेब गावडे, बाजीराव गावडे, समीर पाटील, परसू गावडे, भानुदास जगताप, सत्यवान जगताप, श्रीरंग साळुंखे, संभाजी जाधव, आबासाहेब गावडे, शंकरराव ठावरे, नारायण शिंंगाडे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)आंदोलनात सर्वप्रथम मीच पाठीशी : भोसलेडॉ. अतुल भोसले म्हणाले, ‘धनगर समाजासाठी गेल्या २४ वर्षांपासून घरादाराचा त्याग केलेले आणि धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरून शासनाशी तीव्र संघर्ष करण्याचे धाडस दाखविण्याऱ्या महादेव जानकरांचे खरोखरच कौतुक करावे तेवढे थोडे आहे. आज अशा पद्धतीने धनगर समाजाचे खंबीर नेतृत्व माझ्या पाठीशी असल्याने मला काळजी करायचे कारण नाही. पण, ज्या सरकारने धनगर आरक्षणाला वाटाण्याच्या अक्षता लावल्या, त्यांना निवडणुकीत पराभूत केल्याशिवाय हा समाज स्वस्थ बसणार नाही. धनगर समाजाचे आंदोलन ज्यावेळी पहिल्यांदा कऱ्हाडात झाले, तेव्हा या मागणीला सर्वांत पहिला पाठिंबा माझा होता. त्यानंतर सत्ताधाऱ्यांनी राजकारणासाठी पाठबळाचे नाटक केले.’
काँग्रेस-राष्ट्रवादीने धनगर समाजाला लाथाडले
By admin | Published: October 07, 2014 10:42 PM