वडगाव हवेली : २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला देशातील केवळ ३१ टक्के लोकांनी स्वीकारले. उर्वरित ६९ टक्के मतांचे विभाजन झाल्याने नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. आपल्यातील मतविभाजन टाळले असते, तर भाजपला सत्ता अशक्य होती. काँगे्रस विचाराचे सर्वजण एकत्र आलो तर केंद्र व राज्यातील सरकारला सळो की पळो करू, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
वडगाव हवेली, ता. कऱ्हाड येथे आमदार विश्वजित कदम यांची विधानसभेवर बिनविरोध आमदार म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचा नागरी सत्कार व गावातील विविध विकासकामांचे भूमिपूजन तसेच उद्घाटन असा संयुक्त कार्यक्रम नुकताच पार पडला. याप्रसंगी ते बोलत होते.कऱ्हाड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार आनंदराव पाटील, आमदार जयकुमार गोरे, आमदार डॉ. विश्वजित कदम, भारती विद्यापीठाचे उपाध्यक्ष डॉ. इंद्र्रजित मोहिते, अजितराव पाटील-चिखलीकर, सुनील पाटील, कºहाडचे नगरसेवक इंद्रजित गुजर, शिवराज मोरे, राजेंद्र्र चव्हाण, मनोहर शिंदे, पैलवान नानासाहेब पाटील, अॅड. नरेंद्र नांगरे-पाटील, शिवाजीराव मोहिते, नितीन थोरात, प्रतापराव देशमुख, संयोजक व जिल्हा परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते जयवंतराव जगताप, येरवळेचे सरपंच सुभाषराव पाटील, दुर्गेश मोहिते, उमेश साळुंखे आदींची उपस्थिती होती.आमदार विश्वजित कदम म्हणाले, ‘पतंगराव कदम यांनी ४५ वर्षे केलेल्या सेवेची पुण्याई मला बिनविरोध होण्यामध्ये कामी आली. महाराष्ट्राचे संरक्षण व शेतकऱ्यांचे शोषण थांबविण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीला राज्यातील जनतेच्या हितासाठी एकत्र येणे गरजेचे आहे.’
यावेळी आमदार आनंदराव पाटील, आमदार बाळासाहेब पाटील, डॉ. इंद्र्रजित मोहिते, अजितराव पाटील, डॉ. सुधीर जगताप यांनी मनोगते व्यक्त केली. शंकर जगताप यांनी स्वागत केले. जयवंतराव जगताप यांनी प्रास्ताविक केले. विजय माने यांनी सूत्रसंचालन केले.मोदी सरकारकडून योजनांचे बारसे : जयकुमार गोरेकार्यक्रमप्रसंगी जयकुमार गोरे म्हणाले, ‘गेल्या तीन वर्षांत मोदी सरकारने काँग्रेसने राबवलेल्या योजनांचे बारसे घालून जुन्या योजनांची केवळ नावे बदलण्याचे काम केले. आघाडी सरकारच्या काळातील गॅसचा दर भाजप सरकारने दुप्पट केला. शेतकºयांचे तर यांनी बेहाल केले आहेत. त्यामुळे हे जुलमी सरकार घालवण्यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे.एकाच व्यासपीठावर पाच आमदारवडगाव हवेली येथे आमदार विश्वजित कदम सत्कार कार्यक्रम नुकताच पार पडला. यावेळी या कार्यक्रमास पाच आमदार एकाच व्यासपीठावर पाहायला मिळाले. आमदार पृथ्वीराज चव्हाण, आमदार जयकुमार गोरे, आमदार बाळासाहेब पाटील, आमदार आनंदराव पाटील यांच्या एकत्रित आल्यामुळे नागरिकांच्यात हा चर्चेचा विषय ठरला.