दशरथ ननावरे- खंडाळा सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेची पंचवार्षिक निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने खंडाळा तालुक्यातील राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. जिल्हा बँकेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रीय काँग्रेस यांचे साटेलोटे होण्याची दाट शक्यता असल्याने राष्ट्रवादीला सरसरळ बाय मिळणार अशीच चर्चा असली तरी राष्ट्रवादीअंतर्गत उमेदवारांना मोठी रस्सीखेच आहे. याशिवाय काँग्रेसने नमती भूमिका घेतल्यास अंतर्गत बंडाळीची मोठी शक्यता आहे.खंडाळ तालुक्यातील ५१ विकास सेवा सोसायट्यांमधून जिल्हा बँकेतील एक संचालक निवडला जाणार आहे. यासाठी सर्व सोसायट्यांच्या ठरावाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. काही सोसाट्यांच्या नव्याने निवडी झाल्याने ठरावात सूचनेनुसार बदलही झाले आहेत. असे असले तरी तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्राबल्य आहे. त्यामुळे राष्ट्रवादीतच उमेदवारीसाठी रस्सीखेच आहे. बँकेचे विद्यमान संचालक दत्तानाना ढमाळ यांच्यासह जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष नितीन भरगुडे-पाटील, जिल्हा परिषद सदस्य आनंदराव शेळके-पाटील हे यावेळी इच्छुक आहेत.गतवेळी जिल्हा बँकेसाठी मोठा संघर्ष झाला होता, मात्र खंडाळ््यात सहकारी साखर कारखान्याचा उमेदवार दिला जाणार नसल्याचा अलिखित करार झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे काँग्रेसची रणांगणातून सपशेल माघार राहिली तर राष्ट्रवादीला बिनविरोध निवडून जाण्याची संधी आहे. मात्र कारखाना निवडणुकीत काँग्रेसचा एक गट नाराज आहे. त्यामुळे बँकेला अपक्ष उमेदवार देऊन चुरस निमाण होण्याचीही शक्यता आहे.राष्ट्रवादीअंतर्गत मोठी चुरस असली तरी वरिष्ठ नेत्यांचा निर्णय अंतिम राहणार आहे. विद्यमान संचालक दत्तानाना ढमाळ यांचे पाच वर्षांतील कामगिरी चांगली राहिली आहे, तसेच बँकेचे उपाध्यक्ष असताना अनेक योजना यशस्वीपणे राबविल्या आहेत. शिवाय तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष म्हणूनही उत्तम काम करून पक्ष बळकट केला आहे. त्यामुळे या पदावर दत्तानाना ढमाळ यांचा प्रभावीपणे दावा आहे, तर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष नितीन भरगुडे-पाटील यांच्याकडे क्षमता असतानाही पक्षाने आजवर तशी संधी दिली नाही. त्यामुळे त्यांनाही यावेळी मोठ्या अपेक्षा आहेत. जिल्हा परिषद सदस्य आनंदराव शेळके-पाटील यांची जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी मोठी फिल्डिंग होती; मात्र वर्णी लागली नसल्याने बँकेच्या उमेदवारीसाठी त्यांची प्रबळ दावेदारी आहे. त्यामुळे योग्य उमेदवार देण्याची मोठी जबाबदारी पक्षावर येऊन ठेपली आहे. याशिवाय जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष बाजीराव पाटील यांच्या सोसायटी मतदार संघावर मोठा पगडा आहे. त्यामुळे त्यांची भूमिका निर्णायक समजली जाते.
खंडाळ्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचे साटेलोटे
By admin | Published: March 30, 2015 10:45 PM