सांगली : विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय हालचाली गतिमान झाल्या असल्या तरी, कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी असाच सामना रंगण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे दोन्ही कॉँग्रेसच्या नेत्यांनी एकमेकांच्या हालचालींवर ‘वॉच’ ठेवण्यास सुरुवात केली आहे. पक्षीय नेत्यांच्या दौऱ्यापासून, बैठका, मतदारांच्या भेटीगाटी अशा सर्वप्रकारच्या घडामोडींची माहिती पक्षीय नेत्यांकडून घेतली जात आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी अर्ज दाखल होताना कॉँग्रेस नेत्यांचे लक्ष राष्ट्रवादीच्या घडामोडींकडे लागले होते. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीपर्यंत कोणत्याही राजकीय घडामोडी होऊ शकतात. तरीही आतापासूनच निवडणुकीविषयी दोन्ही कॉँग्रेस नेते कमालीची सतर्कता बाळगून आहेत. अन्य पक्षांचे संख्याबळ कमी असल्यामुळे त्यांच्या हालचालींकडे दोन्ही कॉँग्रेस नेत्यांनी दुर्लक्ष केले आहे. निवडणुकीत नियोजनावर जास्त भर देण्यात आला आहे. यापूर्वीच्या विधानपरिषद निवडणुकांची माहिती घेऊन त्यानुसार सांगली-सातारा विधानपरिषद निवडणुकीचा ‘पॅटर्न’ ठरविण्याकडे कॉँग्रेस नेत्यांचा कल आहे. (प्रतिनिधी)
कॉँग्रेस, राष्ट्रवादीचा एकमेकांवर ‘वॉच’
By admin | Published: November 02, 2016 11:38 PM