विटा : सांगली मार्केट कमिटी सर्वांनी खाल्ली तरी ३८ कोटी रूपये शिल्लक राहिले. त्यामुळे शेतीमालाला चांगला भाव देण्यासाठी बाजार समित्या व शेतीपूरक संस्था चांगल्या चालल्या पाहिजेत. थोड्या पाण्यात व थोड्या शेतीत जास्त उत्पादन घेऊन शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम उभा राहण्यासाठी आगामी काळात शेतीपाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी संपविला पाहिजे, असे मत व्यक्त करून, अवघ्या एका वर्षावर येऊन ठेपलेली विटा नगरपरिषद निवडणूक यावेळीही कॉँग्रेस पक्षच लढविणार असून त्यासाठी युवकांनी तयारीला लागावे, असे आवाहन माजी मंत्री आ. डॉ. पतंगराव कदम यांनी केले.विटा येथे मनमंदिर युथ फौंडेशनच्यावतीने आयोजित ‘मनमंदिर अॅग्रो’ कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. कदम बोलत होते. यावेळी कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम, रामरावदादा पाटील, जि. प. सदस्य डॉ. नामदेव माळी, सुहास शिंदे, कृष्णत गायकवाड, अॅड. सुमित गायकवाड, अॅड. अजित गायकवाड, सभापती आनंदराव पाटील उपस्थित होते.यावेळी डॉ. कदम म्हणाले, खानापूर तालुक्यात शेतीपाण्याचा प्रश्न गंभीर आहे. मी मंत्री असताना ताकारी, टेंभू, म्हैसाळ योजनेचे २५० कोटी वीज बिल शासनाकडून भरले. परंतु, आता तसे होताना दिसत नाही. राज्य कुणाचे असावे हे आता जनतेला समजू लागले आहे. कृषी प्रदर्शनाचा शेतकऱ्यांना फायदा होईल.अशोकराव गायकवाड यांचेही भाषण झाले. अॅड. अजित गायकवाड यांनी कृषी प्रदर्शन आयोजित करण्याचा हेतू विषद केला, तर अॅड. सुमित गायकवाड यांनी, आतापर्यंत जनतेच्या हिताची कामे करण्यासाठी आम्ही प्राधान्य दिले असून यापुढील काळातही जनतेची कामे करण्यासाठी अशोकराव गायकवाड यांना ताकद द्यावी, असे सांगितले. यावेळी आदर्श शेतकरी सुरेश शिंदे, काकासाहेब पाटील, प्रताप कचरे, प्रकाश गायकवाड, भगवान पाटील, रामभाऊ जाधव या शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमास प्रतापराव साळुंखे, शांताराम कदम, माजी नगराध्यक्ष नंदकुमार पाटील, सुशांत देवकर, नगरसेवक अनिल म. बाबर, दिलीप आमणे, उत्तम चोथे, संजय भिंगारदेवे आदी उपस्थित होते. चंद्रशेखर यादव यांनी आभार मानले. (वार्ताहर)काँग्रेसची सूत्रे तरुणांच्या हातात देणार : मोहनराव कदमराजकारण करीत असताना समाजकारणाला प्राधान्य दिले पाहिजे. यापुढील काळात कॉँग्रेसची सर्व सूत्रे जिल्ह्यातील तरूणांच्या हातात देणार असून मी फक्त सेनापती म्हणून काम करणार असल्याचे मत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम यांनी व्यक्त केले. तसेच तरूणांना त्यांनी आधुनिक तंत्राचा वापर करून शेती करण्याचे आवाहन केले.
विटा पालिकेची निवडणूक काँग्रेस पक्षच लढविणार
By admin | Published: December 05, 2015 12:35 AM