कराड : लोकशाही टिकून राहण्यासाठी विरोधी पक्ष बळकट असायलाच हवा; पण आज काँग्रेसचेच लोक पक्ष सोडून जायला लागले आहेत. स्वतःच तो पक्ष कमकुवत होत आहे. त्याला आम्ही काय करणार? असा सवाल केंद्रीय उद्योग राज्यमंत्री सोम प्रकाश यांनी केला. काँग्रेस नेस्तनाबूत झाली आहे. प्रादेशिक पक्षही संपतील असे विधान त्यांनी केले होते. त्यावर माध्यमांनी त्यांना छेडले होते.कराड येथे आयोजित पत्रकार परिषदेत मंत्री सोम प्रकाश बोलत होते. यावेळी सातारा लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे प्रभारी डॉ. अतुल भोसले, प्रदेश सचिव विक्रम पावस्कर, जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे, रामकृष्ण वेताळ,धैर्यशील कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.तयारी करण्यात चुकीचं काय?सातारा लोकसभा हा शिवसेनेच्या वाट्याचा आहे. मग मित्र पक्षांच्या मतदारसंघात भाजपची तयारी कशासाठी सुरू आहे? याबाबत विचारताच मंत्री सोम प्रकाश म्हणाले, निवडणुकीला अजून बराच अवधी आहे. त्यावेळी कोणी उभं राहायचं हे ठरवता येईल. पण तयारी करण्यात चुकीचं काय आहे? असा सवाल त्यांनी केला. तर उमेदवार कोण असणार? याबाबत विचारतात माझ्या दोन्ही बाजूला व्यासपीठावर बसलेले सगळेच तगडे उमेदवार आहेत. पक्ष आदेश देईल तो शड्डू ठोकेल असे त्यांनी स्पष्ट केले.मंत्री सोम प्रकाश म्हणाले, गेले दोन दिवस मी जिल्ह्यात दौरा केला. त्यात अत्यंत चांगला प्रतिसाद वाटला आहे. तर जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे यांनी जिल्ह्यातील प्रत्येक निवडणूक चिन्हावर लढण्याचा आमचा प्रयत्न राहील असे यावेळी सांगितले.नरेंद्र पाटील नाराज नाहीत!माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील यांनी सातारा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. ते भाजपचे नेते आहेत. मात्र सध्या सातारा लोकसभा मतदारसंघाच्या या संपर्क अभियानात ते दिसत नाहीत .ते पक्षावर नाराज आहेत का? याबाबत विचारताच भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे यांनी ते नाराज नाहीत. फक्त पूर्व नियोजित कार्यक्रमामुळे येथे उपस्थित नाहीत असे सांगितले.
इंडस्ट्रियल कॉरिडोर म्हसवडलाच!सातारा जिल्ह्यात इंडस्ट्रियल कॉरिडोर म्हसवड की कोरेगाव याबाबत दोन आमदारांच्यात सध्या वाद सुरू आहे? असा प्रश्न मंत्री सोम प्रकाश यांना विचारला. पण जयकुमार गोरे म्हणाले, इंडस्ट्रियल कॉरिडोर म्हसवडला मंजूर आहे. काहीजण व्यक्तिगत फायदा डोळ्यासमोर ठेवत त्याची कोरेगावला मागणी करत आहेत. पण त्यांचा हेतू सफल होणार नाही. असा टोला त्यांनी नाव न घेता आमदार महेश शिंदे यांना लगावला.