Satara: रस्ता नाही तर टोल नाही; आनेवाडी, तासवडे टोलनाक्यावर काँग्रेसचे आंदोलन, विनाटोल वाहने सोडली
By दीपक शिंदे | Published: August 3, 2024 12:50 PM2024-08-03T12:50:21+5:302024-08-03T12:52:16+5:30
मोदी-गडकरींच्या खिशातील पैसा आहे का?, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा संतप्त सवाल
उंब्रज/भूईंज : खड्डेयुक्त महामार्ग असताना केंद्रसरकारने दोन दोन ठेकेदारांना ठेका दिलेला आहे. हा जनतेचा पैसा आहे. मोदी गडकरींच्या खिशातील पैसा आहे का? असा संतप्त सवाल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी तासवडे टोलनाका येथे केला. दरम्यान, गेली ३ तास टोलनाक्यावरून आंदोलकांनी वाहने फ्री सोडून आंदोलन सुरूच ठेवलेले आहे.तासवडे टोलनाका येथे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने टोलबंद आंदोलन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार विश्वजित कदम, उदयसिंह पाटील-उंडाळकर, शिवराज मोरे यांच्यासह सातारा जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, अदानी आणि रिलायन्सला महामार्गाच्या कामाचा काय अनुभव आहे. म्हणून त्यांना ठेका दिला आहे. गेल्या वर्षांपासून प्रवाशांची परवड सुरू असून महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून पंधरा वीस टक्के कमिशन घेण्यासाठी चुकीच्या मार्गाने ठेका देण्याची प्रथा मोदींनी सुरू केली आहे. महामार्गाचे उप ठेका डीपी जैन यांना दिले असून गेल्या सहा महिन्यांपासून सुमारे हजार कामगारांचे पगार झालेले नाहीत. यामुळेच कामाला गती मिळत नसून याचा नाहक त्रास जनतेला भोगावा लागत आहे.
आनेवाडी टोलनाक्यावरही काँग्रेसच्यावतीने जोरदार आंदोलन करण्यात आले. सकाळी नऊ वाजता महामार्गावरील वाहनांना कोणताही टोल न देता सोडण्यात आले. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश जाधव, विराज शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार शशिकांत शिंदे, सुनील माने, राजकुमार चौगुले देखील या आंदोलनात सहभागी झाले होते. रस्त्याची दुरावस्था आणि पर्यायी मार्ग याबाबतही अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. स्थानिक लोकांना टोलमाफी करण्यात यावी अशी मागणीही करण्यात आली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांकडे बैठकीची मागणी
टोल संदर्भात अनेक अडचणी आहेत. याबाबत टोल व्यवस्थापनाला प्रश्न सोडविता येत नसतील तर जिल्हाधिकाऱ्यांशी बैठक आयोजित करुन योग्य तो मार्ग काढावा. आता आंदोलन झाले आणि नंतर पुढे काही होणार नाही या गैरसमजात राहू नये. जर टोल वसुली सुरु झाली तर यापेक्षा मोठे आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.