'मोदी हटाव.. संसार बचाव', गॅस दरवाढविरोधात साताऱ्यात काँग्रेसची निदर्शने
By दीपक देशमुख | Published: March 3, 2023 03:33 PM2023-03-03T15:33:53+5:302023-03-03T15:55:42+5:30
महागाई विरोधात महागाईमुक्त भारत आंदोलन
सातारा : महागाईने जनता होरपळत असतानाच केंद्र सरकारने गॅस दरवाढ केली. याच्या निषेधार्थ राष्ट्रीय काग्रेस कार्यकर्त्यांनी काँग्रेसभवनासमोर मोकळे गॅस सिलिंडर रस्त्यावर ठेवून जोरदार निदर्शने केली. भाजपला घालवा संसार वाचवा, मोदी हटाव संसार बचाव, मोदी सरकारचा धिक्कार असो, गॅस दरवाढ कमी झालीच पाहिजे, अशा घाेषणा देत दरवाढीचा तीव्र निषेध करण्यात आला.
प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आमदार नाना पटोले यांच्या आदेशानुसार व आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली मोदी सरकारच्या महागाई विरोधात महागाईमुक्त भारत आंदोलन करण्यात आले. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस भवनासमोर जमून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी महिला कार्यकर्त्याही मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव म्हणाले, भाजप सरकारच्या काळात महागाईमुळे सर्वसामान्यांचे जगणे अवघड झाले आहे. गॅस दरवाढीने ग्रामीण भागातील महिलांना पुन्हा चुलीसमोर आणून ठेवले आहे. सरकारने गॅस दरवाढ मागे घ्यावी.
यावेळी मोदी हटाव संसार बचाव, मोदी सरकारचा धिक्कार असो, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा विजय असो, गॅस दरवाढ कमी झालीच पाहिजे अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी महिला जिल्हाध्यक्ष अल्पनाताई यादव, जिल्हा सरचिटणीस नरेश देसाई, धनश्री महाडिक, जगन्नाथ कुंभार, मनोज तपासे, अन्वर पाशाखान, सुषमा राजेघोरपडे, रजिया शेख, अरबाज शेख आदी उपस्थित होते.