कऱ्हाड (सातारा) : ज्येष्ठ नेते विलासराव पाटील-उंडाळकर हे आमचे मार्गदर्शकच आहेत. ज्यामुळे काँगेस पक्षाचे बळ वाढेल अशी कोणतीही गोष्ट केली पाहिजे, अशी माझी भूमिका आहे.
माझ्यापेक्षा सुशीलकुमार शिंदे यांचे ते जवळचे मित्र आहेत. मध्यंतर कऱ्हाडात शिंदेंचा उंडाळकरांनी कार्यक्रमही घेतला होता. शिंदे आणि पृथ्वीराज चव्हाण जो निर्णय घेतील त्याला माझा पाठिंबा असेल, असे मत प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी व्यक्त केले.कऱ्हाड येथे संघर्ष यात्रेच्या निमित्ताने आलेल्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी सोमवारी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, हर्षवर्धन पाटील, आमदार आनंदराव पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.काँग्रेस पक्ष बळकट करण्यासाठी सातारा जिल्ह्यामध्ये काही लोकांची घरवापसी होणार आहे का? याबाबत माध्यमांनी छेडले त्यावर अशोक चव्हाण म्हणाले,सध्याच्या सरकारविरोधात जनतेमध्ये प्रचंड असंतोष आहे. त्यामुळे काँग्रेसचेच सरकार पुन्हा पाहिजे, अशी भूमिका लोक घेऊ लागले आहेत आणि आणखी कुणी काँग्रेसच्या घरात परत आलं तर आम्ही त्यांचं स्वागतच करणार आहोत.