सातारा : लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रीय काँग्रेसने तयारी सुरू केली असून आता सातारा आणि माढा लोकसभा मतदारसंघात बैठका घेण्यात येणार आहेत. त्यातील सातारा मतदारसंघातील बैठक दि. ११ आणि १२ ऑगस्ट रोजी विधानसभा मतदारसंघ होणार असून निरीक्षक व आमदार भाई जगताप हे दोन दिवस जिल्ह्यात असणार आहेत. यातून काँग्रेस निवडणुकीची जोरदारी तयारी करत असल्याचेच स्पष्ट होत आहे.लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने स्थानिक पातळीवरील सध्याची राजकीय स्थिती काय आहे याची माहिती मिळण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लोकसभा मतदारसंघनिहाय आढावा घेण्याची सूचना केली आहे. त्यानुसार सातारा लोकसभा मतदारसंघासाठी निरीक्षक म्हणून मुंबई प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि आमदार भाई जगताप यांची निवड केली आहे. तसेच माढा लोकसभा मतदारसंघासाठी माजी खासदार हुसेन दलवाई आणि प्रदेशचे उपाध्यक्ष मोहन जोशी निरीक्षक असणार आहेत. सातारा लोकसभा मतदारसंघातील बैठका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या मार्गदरशनाखाली आणि जिल्हा प्रभारी श्रीरंग चव्हाण-पाटील, सहप्रभारी निखिल कवीश्वर यांच्या उपस्थितीत होतील.या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डाॅ. सुरेश जाधव यांनी विधानसभा मतदारसंघातील तालुकाध्यक्ष, तसेच प्रदेश प्रतिनिधी, महिला आघाडी, जिल्हा आणि तालुका कार्यकारिणी, विविध सेल पदाधिकाऱ्यांनी निश्चित केलेल्या वेळेत उपस्थित रहावे, असे आवाहन केले आहे.सातारा लोकसभा मतदारसंघ आढावा बैठका...दि. ११ रोजी दुपारी दीडला कऱ्हाडमध्ये कऱ्हाड दक्षिण विधानसभा मतदारसंघाची बैठक होईल. त्यानंतर तीन वाजता पाटण आणि साडे चारला कऱ्हाड उत्तर मतदारसंघाची बैठक होणार आहे. त्याचबरोबर दि. १२ रोजी सातारा काॅंग्रेस कमिटीत सकाळी ११ ला सातारा विधानसभा मतदारसंघ, दुपारी १२ ला कोरेगाव आणि एक वाजता वाई विधानसभा मतदारसंघाची बैठक होणार आहे, अशी माहिती जिल्हा सरचिटणीस नरेश देसाई यांनी दिली आहे.
काँग्रेसने सुरू केली लोकसभा निवडणुकीची तयारी; निरीक्षक, आमदार भाई जगताप सातारा दौऱ्यावर
By नितीन काळेल | Published: August 09, 2023 6:53 PM