कऱ्हाड : केंद्र सरकारचे शेतकरीविरोधी कायदे, इंधन दरवाढ याविरोधात शुक्रवारी काँग्रेस पक्षाच्यावतीने येथील तहसीलदार कार्यालयासमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले. यावेळी काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कऱ्हाड दक्षिण काँग्रेस कमिटी व कऱ्हाड शहर काँग्रेस कमिटी यांच्यावतीने हे उपोषण करण्यात आले. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली कऱ्हाड दक्षिण काँग्रेसचे अध्यक्ष मनोहर शिंदे व शहर काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र माने यांनी यासाठी पुढाकार घेतला होता.
देशामध्ये शेतकरीविरोधी कायद्यांविरोधात तीन महिन्यांपेक्षा जास्त कालावधीपासून शेतकरी आंदोलन करत आहेत. त्याला पाठिंबा देण्यासाठी त्याचबरोबर इंधन दरवाढ मोठ्या प्रमाणात झाल्याने सामान्य माणसाचा जीव मेटाकुटीला आला आहे. त्याला विरोध करण्यासाठी शुक्रवारी हे उपोषण आयोजित करण्यात आले होते.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी कमी करत हे उपोषण करण्यात आले. यावेळी पंचायत समिती सदस्य नामदेव पाटील, राजेंद्र पाटील, नगरसेवक इंद्रजित गुजर, नितीन थोरात, शिवाजी मोहिते, विवेक पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी आंदोलकांनी हातामध्ये घेतलेले निषेधाचे फलक सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.
फोटो : कऱ्हाड - उपोषण
कऱ्हाड येथे काँग्रेसच्यावतीने शुक्रवारी आयोजित केलेल्या एकदिवसीय उपोषणात कार्यकर्ते सहभागी झाले होते. (छाया : अरमान मुल्ला )