कराड दक्षिणेत काँग्रेस एकवटली!, भाजपच्या डॉ. अतुल भोसलेंचा लागणार कस
By प्रमोद सुकरे | Published: May 9, 2023 12:16 PM2023-05-09T12:16:13+5:302023-05-09T12:17:04+5:30
बाजार समितीच्या निवडणुकीला विधानसभेचे स्वरूप
प्रमोद सुकरे
कराड: कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. पण येथील काँग्रेस अंतर्गत गटबाजीही तितकाच चर्चेचा विषय राहिला आहे. पण नुकत्याच झालेल्या शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत या गटबाजीला मुठमाती देऊन काँग्रेस एकवटलेली दिसली. त्याचेच प्रतिबिंब निकालातही विजयाच्या रूपाने दिसून आले. पण त्यामुळे भाजपचे नेते डॉ. अतुल भोसले यांच्यासमोर आव्हान उभे राहिले आहे.
सातारा जिल्ह्यात काँग्रेसमध्ये पृथ्वीराज चव्हाण -बाबा व विलासराव पाटील -काका असे दोन गट पाहायला मिळाले होते. पण पृथ्वीराज चव्हाण लोकसभेला तर विलासराव पाटील हे कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून प्रतिनिधित्व करीत होते. त्यामुळे दोघांनाही तशी फारशी अडचण जाणवली नाही.असे म्हणता येईल.
विलासराव पाटील उंडाळकरांनी तर कराड दक्षिणचे सलग ७ वेळा प्रतिनिधित्व केले. राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर जिल्ह्यात मुळच्या काँग्रेसची बरीच पडझड झाली. पण विलासराव पाटलांनी आपला बालेकिल्ला मजबूत ठेवला. त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी कराड दक्षिणेतून उमेदवारी केली. त्यावेळी मात्र विलासराव पाटील उंडाळकरांनी राष्ट्रवादीच्या मदतीने बंडखोरी केली.
पण मतदारांनी काँग्रेसलाच 'हात' दिला. त्यानंतर गतनिवडणुकी पुन्हा एकदा पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढवली तेव्हा अँड. उदयसिंह पाटील यांनी बंडखोरी केली पण 'पृथ्वीराज'च जिंकले. त्यानंतर विजयी झालेल्या 'पृथ्वीबाबां'चे अभिनंदन करायला उदयसिंह पाटील त्यांच्या बंगल्यावर दुसऱ्याच दिवशी पोहोचले ही बाब वेगळीच!
मग या दोन गटांच्या मनोमिलनाचा कार्यक्रमही पार पडला. पण एवढे वर्ष एकमेकांविरोधात लढलेले कार्यकर्ते जादूची कांडी फिरवल्यासारखे लगेच एकत्रित थोडेच होणार आहेत? त्यासाठी वेळ गेलाच.
वर्षभरापूर्वी राज्यात महाविकास आघाडी सरकार होते. तेव्हा जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक जाहीर झाली. कराड सोसायटी गटातून मात्र काँग्रेस- राष्ट्रवादीतच जुंपली. तत्कालीन सहकार मंत्री बाळासाहेब पाटील व काँग्रेसचे प्रदेश सचिव अँड. उदयसिंह पाटील यांच्यात लढत झाली. पण त्यावेळी पृथ्वीराज चव्हाण या निवडणुकीपासून अलिप्तच राहिले. पण राष्ट्रवादीचे बाळासाहेब पाटील विजयी झाले. त्याला भाजपचे नेते डॉ. अतुल भोसले यांची मोलाची मदत झाली.
पण तीच आघाडी बाजार समितीच्या निवडणुकीत पुढे आल्यावर काँग्रेसचे कार्यकर्तेच हवालदिल झाले. अनंतर्गत गट बाजूला ठेवून एकत्रित येण्याची गरज साऱ्यांनाच वाटू लागली. नेतेही आपसूक एकत्रित आले. आणि पृथ्वीराज चव्हाण यांनी उदयसिंह पाटील यांनी एकत्रित प्रचाराचा झंजावात केला. कराड दक्षिण काँग्रेसचे अध्यक्ष मनोहर शिंदे, उपाध्यक्ष नितीन थोरात, नाना पाटील, नरेंद्र पाटील, इंद्रजीत चव्हाण, प्रा. धनाजी काटकर, रोहित पाटील, संताजी थोरात, वैभव थोरात, धनाजी थोरात अशा सर्वांनी नियोजनबद्ध प्रचारात आघाडी घेतली अन यशही प्राप्त केले. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांना एकीची ताकद आणि महत्त्व कळाले. आता या एकीचा परिणाम भविष्यातील निवडणुकीत कसा व काय पहायला मिळणार यासाठी थोडे थांबावे लागेल.
राष्ट्रवादीत दुफळी
कृष्णा साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष अविनाश मोहिते व उंडाळे ग्रामीण विकास शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अँड.आनंदराव पाटील- उंडाळकर हे दोघेही कराड दक्षिणेत राष्ट्रवादीचे प्रतिनिधित्व करतात. मात्र बाजार समितीच्या निवडणुकीत अविनाश मोहिते हे अँड.उदयसिंह पाटील यांच्याबरोबर राहिले. तर अँड.आनंदराव पाटील -उंडाळकर हे डॉ.अतुल भोसले यांच्या व्यासपीठावर दिसले.
हे नेते प्रचारात दिसलेच नाहीत
बाजार समितीच्या निवडणुकीला विधानसभेचे स्वरूप प्राप्त झाले होते. काँग्रेसचे नेते, पदाधिकारी प्रचारात झाडून उतरलेले दिसले. मात्र भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर, प्रदेश सचिव अँड. भरत पाटील, निमंत्रित सदस्य शेखर चरेगावकर या प्रचारात कुठेही दिसली नाहीत.
त्यांचे 'सांगाती' बदलले
उत्तरचे राष्ट्रवादीचे आमदार बाळासाहेब पाटील यांनी दक्षिणेतील दोन्ही काँग्रेस नेत्यांबरोबर आजवर सलोख्याचे संबंध ठेवले होते. पंचायत समितीच्या सत्तेत त्यांनी उदयसिंह पाटील यांच्या आघाडीला बरोबर घेत कार्यकाल पार पाडला. पृथ्वीराज चव्हाण यांच्या काँग्रेसला सोयिस्कर बाजूला ठेवले.तर विधानसभा निवडणुकीत मात्र पृथ्वीराज चव्हाण यांना आघाडी धर्म म्हणून मदत केली.आता मात्र त्यांचे ''सांगाती'' बदलले आहेत.
बाजार समितीच्या निवडणुकीत ग्रामपंचायत गटातील सर्व जागा आमच्या रयत पँनेलने जिंकल्या आहेत. त्यामुळे तालुक्यातील सामान्य लोकांचा कल नेमका काय आहे हे सांगण्याची गरज उरलेली नाही. - पृथ्वीराज चव्हाण, आमदार कराड दक्षिण)