कराड
काँग्रेसचे नेते व कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील व साताऱ्याचे भाजपचे नेते आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यात शनिवारी कराडात अर्धा तास कमराबंद चर्चा झाली. त्यामुळे राजकीय वर्तुळात याबाबत उलटसुलट चर्चा सुरु आहेत. या बैठकीत सातारा जिल्हा बँक निवडणूक या विषयावर चर्चा झाल्याचे खात्रीशीर समजते. जिल्हा बँकेत काँग्रेसला समान आणि सन्मानजनक संधी दिली जावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे; मात्र याबाबत सत्ताधाऱ्यांमध्ये अजूनही मतैक्य झालेले नाही. या पार्श्वभूमीवर ही चर्चा महत्त्वाची मानली जात आहे.
कराड येथे शनिवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत विविध विकासकामांचा शुभारंभ झाला.त्यावेळी व्यासपीठावर मंत्री सतेज पाटील व आमदार शिवेंद्रराजे भोसले दोघेही उपस्थित होते. कार्यक्रम संपल्यावर सगळे नेतेगण निघून गेले तरी मंत्री पाटील व आमदार भोसले यांची बैठक सुरू होती.
सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. या निवडणुकीत राज्यातील महाविकास आघाडीचा फाॅर्म्युला राबवला जाईल अशी शक्यता एकीकडे वर्तवली जात आहे; मात्र प्रत्यक्षात काँग्रेसने सत्तेत सन्मानजनक वाटा द्या अशी भूमिका घेतल्याने राष्ट्रवादी पुढे अडचण निर्माण झाली आहे. जिल्ह्यात काँग्रेसचा खरा शत्रू हा राष्ट्रवादीच आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भाजपच्या नेत्यांना गोंजारायला सुरुवात केल्याचे समजते. असे घडले तर काँग्रेस एकाकी पडू शकते. त्यामुळे काँग्रेसनेही भाजप नेत्यांशी संपर्क करायला सुरुवात केल्याचे समजते. या पार्श्वभूमीवर आजची बैठक महत्त्वपूर्ण मानली जाते.
वास्तविक जिल्हा बँकेवर राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. पण भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले हे बँकेचे अध्यक्ष आहेत. आम्हाला विचारात घेतल्याशिवाय जिल्हा बँक निवडणूक सोपी जाणार नाही असे एकीकडे भाजपचे नेते सांगताना दिसतात. त्यामुळे जिल्हा बँक निवडणूक कशी होणार ? किती पॅनेल रिंगणात उतरणार? की ही निवडणूक बिनविरोध होणार? याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.
दरम्यान, मंत्री पाटील व आमदार भोसले या दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्या बैठकीचा अधिकृत तपशील समजला नसला तरी या बैठकीत सातारा जिल्हा बँकेचीच चर्चा झाल्याचे खात्रीशीर समजते.
चौकट
मंत्री सतेज पाटील यांचे सातारा जिल्हा बँक निवडणुकीकडे बारीक लक्ष आहे. गत महिन्यात कोल्हापूर येथे कराडमधील एका काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याच्या मुलीचे लग्न होते. त्या लग्नसोहळ्याला सातारा जिल्ह्यातील बरेच नेते उपस्थित होते. त्यावेळी हॉटेल सयाजी येथे मंत्री सतेज पाटील यांनी सातारा जिल्हा बँक निवडणुकीबाबत अनेक नेत्यांशी चर्चा केली होती.