साताऱ्यात काँग्रेसला हवा माण, वाई अन् कऱ्हाड दक्षिण मतदारसंघ
By नितीन काळेल | Published: September 26, 2024 11:15 PM2024-09-26T23:15:36+5:302024-09-26T23:16:16+5:30
विधानसभा निवडणूक : केंद्रीय निरीक्षकांनी घेतला सहा मतदारसंघांचा आढावा
सातारा : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय काँग्रेसनेही जोरदार तयारी केली असून गुरुवारी केंद्रीय निरीक्षकांनी जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेतला. यामध्ये पदाधिकाऱ्यांनी माण, वाई आणि कऱ्हाड दक्षिण मतदारसंघ काँग्रेसकडे घेण्याची जोरदार मागणी केली. यामुळे महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा तिढा सुटणार कसा, असा प्रश्न निर्माण होणार आहे.
साताऱ्यातील काँग्रेस कमिटीत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीकडून नियुक्त निरीक्षक आणि कर्नाटकातील माजी मंत्री विनयकुमार सोरके यांनी आढावा बैठक घेतली. यावेळी जिल्हाध्यक्ष डाॅ. सुरेश जाधव, महिला जिल्हाध्यक्षा अल्पना यादव, जिल्हा सरचिटणीस नरेश देसाई, अजित पाटील, धनश्री महाडिक, रजनी पवार आदी उपस्थित होते.
बैठकीत निरीक्षक सोरके यांनी सातारा लाेकसभा मतदारसंघातील साताऱ्यासह वाई, कोरेगाव, कऱ्हाड उत्तर, कऱ्हाड दक्षिण आणि पाटण विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला. यावेळी पदाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात काँग्रेसची ताकद वाढलेली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत कऱ्हाड दक्षिण मतदारसंघ काँग्रेसकडे राहील. पण, माण आणि वाई मतदारसंघही मिळावा, अशी जोरदार मागणी केली.
यावर निरीक्षक सोरके यांनी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला यश मिळवायचे असेल तर घराघरातील माणूस पक्षाशी जोडायला हवा. बुथ कमिट्या आणखी बळकट कराव्यात, अशी सूचना केली. त्याचबरोबर जिल्ह्यातील तीन मतदारसंघ मिळण्यासाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीकडे प्रयत्न करण्यात येतील, असेही स्पष्ट केले.
राष्ट्रवादीची सात जागांची तयारी...
विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने जिल्ह्यातील इच्छुकांकडून अर्ज मागणी केली होती. त्यानंतर कऱ्हाड दक्षिण वगळता इतर सात मतदारसंघासाठी २९ जणांनी पक्षाकडे उमेदवारीची मागणी केलेली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत कोणाच्या वाट्याला किती मतदारसंघ येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.