सातारा : विधानसभा निवडणुकीत काँग्रेस तसेच महाविकास आघाडीलाही जिल्ह्यात दारुण पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे काँग्रेसमध्ये निराशेचे वातावरण आहे. यापार्श्वभूमीवर काँग्रेसकडून आगामी निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांत आत्मविश्वास भरण्याचे काम सुरू झाले आहे. यासाठी लवकरच जिल्हास्तरावर पक्षाची बैठक घेऊन जिल्हा परिषद, पालिका निवडणुकीबाबत रणशिंग फुंकले जाणार असल्याची माहिती मिळत आहे.
सातारा जिल्हा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला. येथील आमदार आणि स्थानिक स्वराज्य संस्थेवरही काँग्रेसचाच वरचष्मा; पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर काँग्रेसची वज्रमूठ ढिली झाली. बहुतांशी नेत्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना साथ दिली. त्यामुळे सातारा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला ठरला; पण राष्ट्रवादीच्या या बालेकिल्ल्याला भाजपने पाच वर्षांत भगदाडे पाडली. तर आताच्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या वर्चस्वाला महायुतीने उद्ध्वस्त केले.
महायुतीमुळे आघाडीचा एकही आमदार झाला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, काँग्रेस आणि उद्धवसेनेलाही येथे विधानसभेत प्रतिनिधित्व करणारे कोणी राहिलेले नाही. अशातच पुढील काही महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत. यासाठी विधानसभेतील अपयश धुवून काढायचे आणि निराशा झटकून निवडणुकीला सामोरे जायचे, असा निर्धार राष्ट्रीय काँग्रेसने केला आहे. यासाठी पक्षाची रविवारी साताऱ्यात बैठक झाली.
काँग्रेस कमिटीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, जिल्हा प्रभारी श्रीरंग चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली. यावेळी ईव्हीएम विरोधात सह्यांची मोहीम सुरू करण्यात आली. त्यानंतर जिल्हा कार्यकारिणीची बैठक झाली. या बैठकीला पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, जिल्हा सरचिटणीस नरेश देसाई, राजेंद्र शेलार, प्रा. विश्वंभर बाबर, ॲड. श्रीकांत चव्हाण, ॲड. दत्ता धनवडे, निवास थोरात, अन्वर पाशा खान, रजनी पवार, संदीप माने, रजनी पवार, संदीप माने, मनोजकुमार तपासे यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत विधानसभा निवडणुकीबाबत विचारमंथन करण्यात आले. अपयशाच्या कारणांवर विचार करण्यात आला. तसेच आगामी काळात जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकांची निवडणूक होणार आहे. यासाठी तीन-चार महिने निवडणुकीचा माहोल असणार आहे. त्यामुळे निवडणूक पुढील काही दिवसांत कधीही जाहीर होऊ शकते. यासाठी पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी आतापासूनच सतर्क राहावे.
विधानसभेपेक्षा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत ताकदीने काम करावे लागेल. पक्ष मजबूत करण्यासाठी लवकरच जिल्हास्तरावर बैठक घेऊ. यामुळे सर्वच तालुक्यांत गावपातळीपर्यंत तयारी करा, अशी सूचना देण्यात आल्याचे समजते. त्यामुळे काँग्रेसने जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची जोरदार तयारी केल्याचे स्पष्ट होऊ लागले आहे.
पराभवाने खचून जाऊ नका...साताऱ्यातील बैठकीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांत आत्मविश्वास निर्माण होण्यासाठी मार्गदर्शन करताना विधानसभा निवडणुकीतील पराभवाने खचून जाऊ नका. अपयश ढकलून आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीला सामोरे जायचे आहे. कारण, या निवडणुकाच लोकशाहीचा पाया आहेत. यासाठी तयारी करा, अशी सूचना केल्याची माहितीही मिळत आहे.