काँगे्रसला गतवैभव प्राप्त करून देणार... - सुरेश जाधव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2020 12:04 AM2020-02-23T00:04:08+5:302020-02-23T00:05:27+5:30

सातारा जिल्हा काँगे्रसने सुवर्णकाळ अनुभवला आहे. हा काळ पुन्हा आणण्यासाठी कार्यकर्ते जोमाने कामाला लागतील, यात कुठलीच शंका मला वाटत नाही. -डॉ. सुरेश जाधव, जिल्हाध्यक्ष, काँगे्रस

 Congress will get past glory ... | काँगे्रसला गतवैभव प्राप्त करून देणार... - सुरेश जाधव

काँगे्रसला गतवैभव प्राप्त करून देणार... - सुरेश जाधव

googlenewsNext
ठळक मुद्देकाँगे्रस वाढविण्यावर देणार भर

सागर गुजर।

सातारा : जिल्हा काँगे्रसने एकेकाळी जिल्ह्यावर राज्य केले. दिवंगत यशवंतराव चव्हाण, किसन वीर यांनी काँगे्रसची विचारधारा जोमाने पुढे नेली. मात्र या विचारधारेला खीळ बसण्याचे काम मधल्या काळात झाले. ज्यांनी या पक्षाचे नेतृत्व केले, तीच मंडळी काँगे्रसला हात दाखवून निघून गेली. ज्यांना बळ दिले, त्यांनी पक्षाचे बळ वाढविले नाही. आता पुन्हा काँगे्रस उभी राहण्याच्या तयारीला लागलीय. दहा महिन्यांपासून रिक्त असलेले जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव या अनुभवी शिलेदाराच्या हाती आले असून, काँगे्रसला सुवर्ण दिवस पुन्हा प्राप्त करून देण्याचा विश्वास डॉ. सुरेश जाधव यांनी ‘लोकमत ’शी बोलताना व्यक्त केला.

प्रश्न : काँगे्रसच्या दैनंदिन कामाकडे आपण कसे लक्ष देणार आहात?
उत्तर : राष्ट्रीय काँग्रेस कमिटीने माझी सातारा जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्षपदी निवड केली. इथल्या दैनंदिन कामाची माहिती व्हावी, लोकांशी भेटीगाठी करता सुरू केल्या आहेत. मी प्रथमत: इथल्या परिस्थितीचा आढावा घेऊन आगामी काळात पक्षाची पुढील दिशा ठरवणार आहे. जिल्हा काँग्रेस कार्यकारिणी असो वा तालुका स्तरावरील कार्यकारिणी याचीही मी लवकरात लवकर माहिती घेऊन त्या भरणार आहे, त्या पुनर्जीवित करणार आहे.

प्रश्न : काँगे्रसच्या विचारांची परंपरा राखण्यासाठी काय प्रयत्न करणार?
उत्तर : राष्ट्रीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि आमच्या सर्वांचे नेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी माझ्यावर विश्वास ठेवून जिल्ह्याचं अध्यक्षपद मला दिलं आहे, त्याबद्दल मी त्यांचा शतश: ऋणी आहे. त्यांनी दिलेल्या संधीचं मी चीज केल्याशिवाय राहणार नाही. मी काँग्रेसचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे, मी पक्षासाठी अविरत कष्ट करीन आणि पक्षाला जिल्ह्यात गतवैभव प्राप्त करून देईन. जिल्हा काँग्रेसला मोठी परंपरा आहे ती पुढे नेण्याचा मी प्रयत्न करीन.

प्रश्न : काँगे्रसची ताकद कशी वाढविणार?
उत्तर : राज्यात आम्ही आत्ता जरी महाविकास आघाडी सरकारमध्ये काम करत असलो तरी, आम्ही काँग्रेसची ताकद स्वत:च्या बळावर जिल्ह्यात वाढवणार आहोत. आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँगे्रस निश्चितपणे उल्लेखनीय कामगिरी करून जिल्ह्याच्या राजकारणात शिरकाव केल्याशिवाय राहणार
नाही.


काँगे्रसच्या सच्च्या कार्यकर्त्यांना बळ
आजही खेडोपाड्यात सगळीकडे काँग्रेसचा कार्यकर्ता उपलब्ध आहे. तो पक्षाची विचारधारा लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करतो. त्यांना बळ देण्याचं काम आगामी काळात मी जिल्हाध्यक्ष या नात्याने करणार आहे. जिल्ह्यात काँग्रेस पक्ष गावागावामध्ये कसा पोहोचेल, कसा रुजेल यासाठी कार्यक्रम मी आगामी काळात राबवणार आहे. यासाठी मी पक्षातील तरुण व ज्येष्ठ अशा सर्वांनाच सहभागी करून घेणार आहे. तरी जिल्ह्यातील सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांनी या कार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन मी यानिमित्ताने आपणाला करत आहे.
 

निवडणुका ताकदीने लढणार
काँग्रेस पक्षामध्ये समाजातील जास्तीत जास्त लोकांना समाविष्ट करून घेणार आहोत. यामध्ये युवकांचा आणि युवतींचा जास्तीत जास्त सहभाग असेल यासाठी आम्ही आग्रही आहोत. सर्व कार्यकर्त्यांना उत्साह वाटेल, त्यांना लढण्याची उमेद मिळेल, असे वातावरण आगामी काळात पक्षात निर्माण करण्याचा मी प्रयत्न करीन. त्यासाठी आगामी काळात येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, सोसायटी, जिल्हा बँकांच्या निवडणुका ताकदीने लढवून जास्तीत जास्त सदस्य निवडून आणणार आहोत. आता काँगे्रसच्या कार्यकर्त्यांना बळ दिले जाईल. कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविणार आहे.

Web Title:  Congress will get past glory ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.