ढेबेवाडी : वांग नदीला आलेल्या महापुरामुळे ढेबेवाडी विभागातील पंधरा छोटे-मोठे पूल दोन दिवसांपासून पाण्याखाली असल्याने साठ गावे आणि वाड्यावस्त्या संपर्कहीन झाल्या आहेत. संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे काही ठिकाणचे पूल तुटले असून, बहुतेक पुलांचा भराव वाहून गेला आहे. मेंढ, घोटील आणि जितकरवाडी आदी ठिकाणी भूस्खलन झाल्याने तेथील गावांचा धोका वाढला आहे. मराठवाडी धरणात पाणीसाठा वाढल्याने उमरकांचन येथील धरणग्रस्तांच्या घरांना पाण्याने वेढा दिला आहे.
ढेबेवाडी विभागातील सणबूर, जिंती, काळगाव खोऱ्यासह संपूर्ण वाल्मीक पठारावर मुसळधार पावसाने बुधवारी रात्रीपासून थैमान घातले आहे. येथील मेंढनजीक धरणग्रस्तांसाठी बनविलेल्या तात्पुरत्या शेडजवळच भूस्खलन झाल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. डोंगरपठारासह पायथ्याशी वसलेल्या गावांवर आता भूस्खलनाचा धोका वाढल्याने येथील जनता जीव मुठीत धरून आहे.
वांग नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाल्याने बनपुरी, भालेकरवाडी, मंद्रुळकोळे, मालदन, खळे, काढणे, पवारवाडी, धामणी, काळगाव आदी ठिकाणचे मोठे पूल, तर ओढ्यांवर असलेले फरशी पूल दोन दिवसांपासून पाण्याखाली गेल्याने विभागातील दळणवळण ठप्प झाले आहे. या महापुरामुळे जितकरवाडी येथील पुलाचे मोठे नुकसान झाले असून, भरावही वाहून गेला आहे तर सहा कोटी रुपये खर्चून याचवर्षी उभारलेला काढण्यानजीकच्या पुलाचा भराव खचून पुलालाही धोका निर्माण झाला आहे तर अनेक फरशीपुलांचे मोठे नुकसान झाल्याने गावेच्या गावे संपर्कहीन झाली आहेत.
वाल्मीक पठारावरील निगडे, निवी, कसणी, मत्रेवाडी, सलतेवाडी, घोटील, म्हाइंगडेवाडी गावांना जोडणारा पवारवाडी येथील पूलच पाण्याखाली गेला असून, भरावही वाहून गेल्याने येथील अनेकजन अडकून पडले आहेत. उधवणे, रुवले, पाटीलवाडी, सातर, तामीणे, वाल्मीक या गावांना जोडणारा सणबूरनजीकचा ओढ्यावरील पूलच तुटल्यामुळे वाल्मीक पठारच संपर्कहीन झाले आहे.
दरम्यान, नदीकाठी आणि ओढ्याकाठी असलेल्या या विभागातील शेतजमिनींना मुसळधार पावसाचा मोठा तडाखा बसला आहे. या पुराच्या पाण्यामुळे शेकडो हेक्टर शेती पिकांसह वाहून गेली आहे. यामध्ये भातशेती आणि ऊसशेतीला मोठा फटका बसला आहे. मराठवाडी धरणाच्या पाणीसाठ्यात कमालीची वाढ झाल्याने मेंढ येथील मंदिरे पाण्यात बुडाली असून, उमरकांचन येथील धरणग्रस्तांच्या घरात पाणी शिरले आहे. यामुळे धरणग्रस्तांनी तातडीने निवाराशेडमध्ये आपला संसार हलविला.
चौकट
यंत्रणा सतर्क; पण गावांचा संपर्कच होईना..
ढेबेवाडी तळमावले याठिकाणी पोलीस आणि महसूल यंत्रणा सतर्क असली तरी आपत्ती घडलेल्या गावांपर्यंत पोहोचण्यात मोठ्या अडचणी येऊ लागल्याने मोठी कसरत करावी लागते आहे.
फोटो
२३ढेबेवाडी
ढेबेवाडी विभागात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे रस्ते, पूल वाहून गेले आहेत. (छाया : रवींद्र माने)