लोकमत न्यूज नेटवर्क
वाई : ‘मानवी हस्तक्षेपाचा अतिरेक झाल्याने पर्यावरणाचे अपरिमित नुकसान झाले आहे. याचे अनेक दुष्परिणाम दिसत आहेत. पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण व संवर्धन काळाची गरज आहे,’ असे मत सामाजिक वनीकरण वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष चव्हाण यांनी व्यक्त केले.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सामाजिक वनीकरण विभाग, खंडाळा, समता दूत, खंडाळा व हरेश्वर वनसंवर्धन ग्रुप, खंडाळा यांचे संयुक्त विद्यमाने खंबाटकी घाटामध्ये वृक्षारोपण करण्यात आले. खंडाळा तालुक्याचे समतादूत मालन गिरीगोसावी यांनी या कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले. हरेश्वर वनसंवर्धन ग्रुपच्या माध्यमातून यापूर्वी करण्यात आलेल्या कामाचे विशेष कौतुक करण्यात आले.
यावेळी हरेश्वर ग्रुपच्या माध्यमातून खंडाळा तालुक्यातील जास्तीत जास्त तरुणांनी या वृक्ष लागवड आणि संगोपन कार्यक्रमात भाग घेऊन एक वनसंवर्धन चळवळ उभी राहावी, असे प्रतिपादन संतोष चव्हाण यांनी केले. यावेळी सामाजिक वनीकरण विभागाचे वनपाल गंगाराम झांजरे, वनरक्षक आनंदा भालेकर, हरेश्वर वनसंवर्धन ग्रुपचे सदस्य उपस्थित होते. सर्व कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करून वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला.
फोटो : १० वाई
सामाजिक वनीकरण विभाग व हरेश्वर ग्रुपच्यावतीने खंबाटकी घाटात वृक्षारोपण करण्यात आले.