रहिमतपूर : ‘वृक्षतोडीमुळे निसर्गाचा समतोल बिघडत चाललेला आहे. पर्यावरणाचा समतोल अबाधित राखण्यासाठी नागरिकांनी वृक्षलागवडीबरोबरच त्याचे संवर्धन करावे,’ असे आवाहन प्रांताधिकारी ज्योती पाटील यांनी केले.
कोरेगाव तालुक्यातील वाठार किरोली येथे ग्रामपंचायतीच्या वतीने कृषीदिन व वनमहोत्सवदिनानिमित्त वृक्षलागवडीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी प्रांताधिकारी ज्योती पाटील, तहसीलदार अमोल कदम, जिल्हा परिषद सदस्य भीमराव पाटील, विस्तार अधिकारी सपना जाधव, मंडल अधिकारी विनोद सावंत, शाखा अभियंता टिकोळे, सरपंच सुनील कांबळे, उपसरपंच शंकर गायकवाड, तलाठी राहुल होनराव, ग्रामविकास अधिकारी जितेंद्र निकम, कृषी सहायक गायकवाड व ग्रामस्थ उपस्थित होते.
पर्यावरणाची समस्या गंभीर होत आहे. त्यामुळे वृक्षलागवडीचे उपक्रम अत्यंत महत्त्वाचे आहेत. पण वृक्ष लागवडीबरोबच वृक्षसंगोपनही तितकेच गरजेचे आहे. आजच्या तरुण पिढीकडे नवीन संकल्पना आणि अफाट ऊर्जा आहे. ज्येष्ठांचे मार्गदर्शन आणि युवा पिढीची ताकद एकत्र आली तर कुठलेच काम अशक्य नाही. पर्यावरणाचे रक्षण आणि संवर्धन या संकल्पास आपल्या दैनंदिन आयुष्याचा भाग बनवून मोकळेपणाने जगण्यासाठी आणि येणाऱ्या पिढ्यांचे आयुष्य सुरक्षित करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा, असे आवाहन ज्योती पाटील यांनी केले. मान्यवरांच्या हस्ते ग्रामपंचायत हद्दीमध्ये विविध ठिकाणी वृक्षलागवड करण्यात आली.
०७रहिमतपूर
फोटो : वाठार किरोली, ता. कोरेगाव येथे ज्योती पाटील, अमोल कदम, भीमराव पाटील आदींच्या उपस्थितीत वृक्षलागवड करण्यात आली. (छाया : जयदीप जाधव)