कऱ्हाड : अवसायनात निघालेल्या कऱ्हाड जनता सहकारी बँकेतील ठेवीदारांना पाच लाखापर्यंत विम्याचे संरक्षण असणाऱ्या ठेवी परत देण्याची कार्यवाही सुरू असून, आजअखेर ९० कोटी रुपये ठेवीदारांच्या खात्यावर वर्ग करण्यात आल्याची माहिती उपनिबंधक व कऱ्हाड जनता बँकेचे अवसायक मनोहर माळी यांनी दिली. आत्तापर्यंत १२ हजार ७२ खातेदारांना विम्याचा लाभ दिला गेला आहे.
कऱ्हाड जनता सहकारी बँकेतील ठेवीदारांना पाच लाखापर्यंतच्या ठेवी परत देण्यात येत आहेत. पहिल्या टप्प्यात १,४५० ठेवीदारांचे ७ कोटी रुपये बँक ऑफ बडोदा येथे वर्ग करण्यात आले. त्यानंतर टप्प्याटप्प्याने सभासदांचे पैसे त्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले. आजअखेर १२ हजार ७२ सभासदांच्या खात्यावर विम्याचे पैसे वर्ग करण्यात आले आहेत. विम्याची ही रक्कम ९० कोटी रुपये इतकी आहे. विमा संरक्षण असणाऱ्या ३२९ कोटी ७६ लाख ९३ हजार ३११ रुपयांची आर्थिक तरतूद विमा कंपनीकडून झाली आहे. जनता बँकेच्या खात्यावर हे पैसे वर्ग झाले आहेत. बँकेतील ४० हजार ४१५ ठेवीदारांनी क्लेमफॉर्म भरले आहेत. यातील ३९ हजार ३२ ठेवीदारांना ३२९ कोटी ७६ लाख ९३ हजार ३११ रुपये मिळणार आहेत. काही अर्जांमध्ये त्रुटी असल्याने केवायसी व अन्य कागदपत्रं घेऊन त्यांचे क्लेमफॉर्म नव्याने भरण्यात आले आहेत.
जनता बँकेचे एकूण ठेवीदार १ लाख ३३ हजार ४२१ आहेत. त्यापैकी ४० हजार ४१५ ठेवीदारांनी क्लेमफॉर्म दिले आहेत. यातील ३९ हजार ३२ ठेवीदारांचे क्लेमफॉर्म मंजूर झाले आहेत. क्लेमपोटी ३२९ कोटी ७६ लाख ९३ हजार ३११ रुपये प्राप्त झाले आहेत. ठेवीदारांच्या ठेवीचे पैसे त्यांच्या खात्यावर वर्ग करण्याची कार्यवाही सुरू आहे. खातेदारांच्या देय रकमेपोटी आत्तापर्यंत १२३ कोटी रुपये बँकेकडे वर्ग करण्यात आले आहेत. १५ हजार ५२२ सभासदांची नावे कळविण्यात आली आहेत. टप्प्याटप्प्याने त्यांच्या खात्यावर पैसे वर्ग होतील. ज्यांना पैसे मिळाले आहेत; पण रक्कम अपुरी आहे किंवा वारसांच्या खात्यावर पैसे वर्ग होण्यास अडचणी येत आहेत, याबाबत योग्य कार्यवाही करून त्यांना लाभ देण्यात येईल, असे मनोहर माळी यांनी सांगितले.