फलटण : फलटण तालुक्यात कोरोना संक्रमणाची दुसरी लाट हळूहळू ओसरु लागली आहे. सद्यस्थितीत तालुक्यात ११८ कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. ही संख्या दिलासादायक असली तरी प्रशासनाने तिसऱ्या लाटेची धास्ती व्यक्त केली आहे. त्यामुळे प्रशासनाकडून अद्यापही टाळेबंदीचे निर्बंध शिथील न करण्यात आल्याने व्यावसायिकांची परवड सुरूच आहे.
सातारा जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला. टप्प्याटप्प्याने कोरोनाबाधितांची संख्या कमी होताच व्यापाऱ्यांना दुकाने सुरु करण्याची परवानगी देण्यात आली. मात्र, रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागल्याने अवघ्या पंधराच दिवसात जिल्ह्यात अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले. हे निर्देश आजमितीसही लागू आहेत.
कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात असली तरी दुसऱ्या लाटेचा अनुभव पाठीशी असल्याने संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी आरोग्य यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे. विशेषत: तालुक्यातील ग्रामीण भागावर आरोग्य यंत्रणा व प्रशासनाचे विशेष लक्ष असून, रुग्णसंख्या वाढताच संबंधित गावे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करुन परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. तर दुसरीकडे लॉकडाऊनमुळे छोटे व्यावसायिक, हातगाडीवाले, रोजंदारी मजूर, कामगार आदी समाजघटकांवर ओढवणाऱ्या परिस्थितीची नोंद घेऊन प्रशासनाने त्यांना दिलासा देण्यासाठी ठोस पावले उचलण्याची गरज आहे.
(चौकट)
तालुक्याचा लेखाजोखा
एकूण बेड ८५६
रिकामे बेड ७३८
१६ व्हेंटिलेटर
१३४ आयसीयू
१६१ ऑक्सिजन
४२७ जनरल