फलटण : येथील शंकर मार्केट आणि उमाजी नाईक चौक येथे असणार्या मुतारीची अतिशय दयनीय अवस्था झालेली होती. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केल्यानंतर फलटण नगरपालिकेच्या वतीने शंकर मार्केट, उमाजी नाईक येथील मुतारी नव्याने बांधण्यात येत असून, येथे पुरुषांबरोबर महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहाची सोय करण्यात आलेली आहे.
फलटणच्या लोकनियुक्त नगराध्यक्षापदी महिला विराजमान झाल्यावर पहिल्या बैठकीमध्ये फलटण शहरातील विविध चौकात महिलांसाठी स्वच्छतागृहाची सोय उभारण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले होते. आता जवळपास चार वर्षांनंतर का होईना फलटण शहरातील काही चौकात तरी पुरुषांसोबत महिलांसाठीसुद्धा स्वच्छतागृहे बांधण्यात येत आहे. निदान कार्यकाळ पूर्ण होण्याच्या आत तरी लोकनियुक्त महिला नगराध्यक्षांना महिलांच्या महत्त्वाचा प्रश्न सोडविण्यात यश आले असल्याचे यानिमित्ताने बोलले जात आहे.
दरम्यान, सध्या फलटण शहरामधील महत्त्वाच्या ठिकाणावरील स्वच्छतागृहे नगरपालिकेने जमीनदोस्त केल्याने नागरिकांची मोठी कुचंबणा होत आहे, शहरातील मध्यवर्ती ठिकाणच्या शुक्रवार पेठ, गजानन चौक, महानुभव मठ येथील स्वच्छतागृहे पाडण्यात आल्या आहेत. तिथे तसेच क्रांतिसिंह नाना पाटील चौक, महात्मा फुले चौक, गिरवी नाका, जिंती नाका येथे नवीन स्वच्छतागृहे तातडीने बांधणे गरजेचे आहे.