कऱ्हाड : कऱ्हाड -तासगाव मार्गावर पहाटे व्यायामाला गेलेल्या तिघांना भरधाव कंटेनरने चिरडले. किल्ले मच्छिंद्रगड, ता. वाळवा गावच्या हद्दीत पोल्ट्रीजवळ पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास ही भीषण दुर्घटना घडली. अपघातानंतर चालक कंटेनरसह पसार झाला आहे.दीपक ज्ञानू गायकवाड (वय ४५), प्रवीण हिंदुराव गायकवाड (४०) व विशाल धोंडिराम गायकवाड (३०, तिघेही रा. सम्राटनगर, शेणोली, ता. कऱ्हाड ) अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत. दरम्यान, या घटनेनंतर शेणोली गावावर शोककळा पसरली आहे. घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर पोलिसांनी तिन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिले आहेत.घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, कऱ्हाड ते तासगाव जाणाऱ्या मार्गाचे सध्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. या कामासाठी ठिकठिकाणी खोदकाम करण्यात आले आहे. त्यातच या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. दुधारी, ताकारीसह तासगावकडे जाणारी अवजड वाहने याच मार्गावरून जातात.
या मार्गानजीक असलेल्या शेणोली गावातील अनेक ग्रामस्थ पहाटे तासगाव मार्गावरून किल्ले मच्छिंद्रगडकडे चालत व्यायामासाठी जातात. सोमवारी सकाळी गावातील दीपक गायकवाड, प्रवीण गायकवाड, विशाल गायकवाड, रोहित गायकवाड हे चौघेजण व्यायामासाठी गेले होते. त्यापैकी दीपक, प्रवीण व विशाल तिघेजण रस्त्यानजीक बसून व्यायाम करीत होते. त्यावेळी कऱ्हाडहून ताकारीकडे भरधाव निघालेल्या कंटेनरने त्या तिघांना चिरडले. तर रोहित गायकवाड हे काही अंतरावर असल्यामुळे ते बचावले.अपघात निदर्शनास येताच परिसरातील ग्रामस्थांनी त्याठिकाणी धाव घेतली. मात्र, ग्रामस्थ पोहोचेपर्यंत चालक कंटेनरसह पसार झाला. अपघाताची माहिती मिळताच कऱ्हाड ग्रामीण तसेच वाळवा पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी त्याठिकाणी पोहोचले. त्यांनी अपघातस्थळाचा पंचनामा केला. अपघातामुळे या मार्गावरील वाहतूक काहीकाळ ठप्प झाली होती. पंचनामा झाल्यानंतर पोलिसांनी तिन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिले.