नागठाणे : नागठाणे परिसरातील भरतगाववाडी येथे सातारा तहसीलदार सुनील मुनावळे यांनी भेट देऊन कंटेन्मेंट झोनची पाहणी केली. बुधवार दि. १४ एप्रिल रोजी गावामध्ये एकाच कुटुंबातील दोन व्यक्ती कोरोनाबधित आल्याचे समजल्यानंतर भरतगाववाडी ग्रामपंचायतीच्यावतीने ग्रामविकास अधिकारी संजय यादव यांनी घटनास्थळावर तत्काळ भेट देऊन बाधितांच्या घराच्या बाजूचा २५० मीटर परिसर कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करून, येण्या-जाण्यासाठी बंद करून टाकला व आवश्यक कार्यवाही केली.
याबाबतीत गावातील नागरिकांना जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार घालण्यात आलेल्या सर्व नियमांचे योग्य पालन करण्यात यावे, असे आवाहन केले. रविवारी सकाळी तहसीलदार सुनील मुनावळे यांना या घटनेची माहिती मिळताच, त्यांनी भरतगाववाडी येथील कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आलेल्या ठिकाणाची पाहणी करून संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी उपसरपंच संपतराव मोहिते, सदस्य पोपटराव पडवळ, किसन शिंदे, सुशिला घोरपडे, बाळुताई जगताप, पोलीसपाटील जयश्री बर्गे, मनीषा निकम, तसेच ग्रामविकास अधिकारी संजय यादव, तलाठी अशोक साबळे, दिलीप ढाणे, मंडल अधिकारी घोरपडे उपस्थित होते. तहसीलदारांनी या ठिकाणाची पाहणी करून आवश्यक त्या सूचना दिल्या, तसेच विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करा, दुकानदार नियमांचे पालन करतात का? याची खात्री करा, अन्यथा कारवाई करा, अशा सूचना देऊन, नागरिकांनी सर्व नियमांचे व्यवस्थितरित्या पालन करावे, असे आवाहन केले. तसेच संपूर्ण परिस्थितीची पाहणी करून लसीकरण कामकाजाचा आढावा घेऊन तहसीलदार यांनी ग्रामपंचायतीस ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या रणनीतीचा अवलंब करून गावातील ग्रामस्थांना योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या.