सातारा : साताऱ्यातील गुलमोहर कॉलनीत गेल्या अनेक महिन्यांपासून दूषित पाणीपुरवठा सुरू असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या जीवन प्राधिकरणच्या जलवाहिनीवरूनच गटाराचे सांडपाणी वाहत असल्याने ही परिस्थिती उद्भवली असल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे.सातारा शहराचा काही भाग व लगतच्या परिसराला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. पीरवाडीपासून जवळच असलेल्या गुलमोहर कॉलनीला देखील जीवन प्राधिकरणकडूनच पाणीपुरवठा होतो. ज्या जलवाहिनीद्वारे या कॉलनीला पाणी वितरण केले जाते, ती जलवाहिनी ओढ्यालगत आहे. या ओढ्यातील व गटारातील सांडपाणी जलवाहिनीत मिसळत असल्याने पाणी प्रचंड दूषित होत आहे. या पाण्याला उग्र वास येत असून, नागरिकांना कित्येक वेळा पाण्यात अळ्या आढळून आल्या आहे. असा प्रकार सातत्याने घडू लागल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.या गंभीर समस्येबाबत जीवन प्राधिकरणच्या संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना अनेकदा सूचित केले आहे. मात्र, कोणीही ही बाब गांभीर्याने घेत नाही, असा आरोपही रहिवाशांनी केला आहे. जीवन प्राधिकरणने नागरिकांच्या आरोग्यासाठी ही जलवाहिनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
खाली जलवाहिनी, वर गटाराचे पाणी; सातारकरांचे आरोग्य धोक्यात
By सचिन काकडे | Published: February 12, 2024 6:51 PM