पुसेगाव : जिल्हा अनलॉक असताना प्रांताधिकाऱ्यांनी खटाव- माण तालुक्यांतील काही गावे लॉकडाऊन केली आहेत. मात्र, सध्या खरिपाचा हंगाम सुरू असल्याने शेतीशी निगडित दुकानांची वेळ ७ ते ११ ऐवजी दुपारी ४ वाजेपर्यंत करण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
गेली दोन वर्षे कोरोनाशी दोन हात करताना प्रशासन कामाला लागले आहे. काही गावांत गरजेनुसार सातत्याने लॉकडाऊन करावे लागत आहे. जिल्हा अनलॉक झाला तरी प्रतिबंधित क्षेत्राच्या नावाखाली प्रांताधिकाऱ्यांच्या आदेशाने खटाव- माण तालुक्यांतील सुमारे ५० गावे व वाड्या- वस्त्या अद्यापही लॉकडाऊनच्या झळा सोसत आहेत. सध्या खरीप हंगाम सुरू झाला असून, शेतीसाठीची खते, बी-बियाणे शेतकऱ्यांना मिळताना अडचणी येत आहेत. त्यामुळे शेतीशी निगडित दुकाने सकाळी ७ ते ४ वाजेपर्यंत उघडी राहिल्यास शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. बी-बियाणे, खते घेण्यासाठी दुकानांत शेतकऱ्यांच्या रांगा लागत आहेत. सकाळी ११ वाजता दुकानदारांनी आपली दुकाने बंद केल्याने रांगेतील काही शेतकऱ्यांना रिकाम्या हाताने माघारी परतावे लागत आहे. कृषी दुकानातच कर्मचारी कमी असल्याने शेतकऱ्यांना घरपोच सेवा कशी मिळणार?
चौकट :
पिठाच्या गिरण्याही बंद...
कडक लॉकडाऊन असल्याने पुसेगावात पिठाच्या गिरण्याही उघडल्या जात नाहीत. शेजारीपाजारी किती दिवस पीठ मागून घरात भाकऱ्या, चपात्या करणार. पावसाळ्यात मिरची कुटून होती का? वर्षभराची चटणी कशी होणार? अशा चिंता महिलावर्गातून व्यक्त होत आहेत.