सणबूर : सतरा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर जिंती ते मराठवाडी रिंगरोडच्या कामाला मुहूर्त सापडला. मात्र दोन दिवसांतच कामाला ब्रेक लागल्याने ग्रामस्थांतून संतापाची लाट उसळली आहे. कृष्णा खोरेच्या नियोजनशून्य कारभारामुळे ग्रामस्थ अक्षरश: वैतागले आहेत. रस्त्याचे काम पावसाळ्यापूर्वी मार्गी लावा, अन्यथा आंदोलन करू, असा इशारा या भागातील जनतेने दिला आहे. युती शासनाच्या काळात १९९७ मध्ये वांग-मराठवाडी धरणाच्या कामाला सुरुवात झाली. धरणाच्या बॅक वॉटरच्यावरील बाजूस जिंतीसह अनेक लहान-मोठ्या १२ वाड्या-वस्त्या आहेत. या गावांना जोडणारा मराठवाडी ते जिंती रस्ता धरणाच्या बुडीत क्षेत्रामध्ये जात आहे. त्यामुळे त्यावर आजपर्यंत कोणताही निधी शासनाने खर्ची टाकलेला नाही. त्यामुळे जिंती रस्ता वाहतुकीस योग्य राहिलाच नाही. रस्त्याची पूर्ण चाळण झाली आहे. पावसाळ्यात अनेकवेळी जिंती संपर्कहीन होत आहे. त्यामुळे जिंती खोऱ्यातील ग्रामस्थांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. तर जिंतीसाठी पर्यायी रस्ता (रिंगरोड) हा मंजूर असून, हा कृष्णा खोरे विकास महामंडळाकडे वर्ग असल्याचे ग्रामस्थ सांगत आहे. मात्र कृष्णा खोरेच्या नियोजनशून्य कारभारामुळे गेली १७ वर्षे काम रखडले असल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर या परिसरातील लोकांनी बहिष्कार टाकला होता. त्याला सर्व जिंती खोऱ्यातून चांगला प्रतिसादही मिळाला. त्यानंतर विधानसभेला नागरिकांनी मतदान करून आपला राग व्यक्त केला. ते निकालावरून स्पष्ट झाले होते. आज राज्यात पुन्हा युतीचे शासन सत्तेवर आले आहे.काम बंद असल्याने ग्रामस्थांमध्ये पुन्हा संतापाची लाट पसरली असून, कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या कारभाराबद्दल लोकांच्या मनात शंका उपस्थित होत आहे. (वार्ताहर)पालकमंत्री परतले, काम थांबलेकाही दिवसांपूर्वी पालकमंत्री विजय शिवतारे यांनी वांग-मराठवाडी धरणावर धरणग्रस्तांची भेट घेऊन त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या होत्या. त्यावेळी रिंगरोडचे गाऱ्हाणे पालकमंत्र्यांसमोर मांडण्यात आले होते. पालकमंंत्र्यांच्या दौऱ्यानंतर चारच दिवसांत रिंंगरोडच्या कामाला सुरुवात झाली होती. मात्र, काम सुरू झाल्यानंतर दोनच दिवसांत रस्त्याच्या कामाला ब्रेक लागला. तो अद्याप तसाच आहे. रिंगरोडचे काम मार्गी लागले नाही, हे आमचे दुर्दैव असून, याला शासनच जबाबदार आहे. अजून आम्हाला किती दिवस रस्त्यासाठी हाल अपेष्टा सहन कराव्या लागणार. काम बंद असण्याचे कारण संबंधितांनी स्पष्ट करावे. - अंकुश महाडिक, सामाजिक कार्यकर्ते, कोळेकरवाडी
सतरा वर्षांनी सुरू; पण दोन दिवसांत बंद !
By admin | Published: February 18, 2015 9:41 PM