कुडाळ : कुडाळ परिसरात शनिवारी सायंकाळी जोरदार पावसाने सुरुवात केली. पावसाची संततधार उशिरापर्यंत सुरू होती. अतिशय शांतपणे पाऊस सुरू होता. यामुळे आता मशागतीच्या कामाबरोबरच पेरणीची सुरुवात होईल, अशी शक्यता वर्तविली जात आहे.
परिसरात शनिवारी सकाळपासूनच बदललेल्या वातावरणामुळे अधिक उष्मा जाणवत होता. त्यातच सायंकाळी पावसाच्या जोरदार आगमनाने सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. अतिशय संथपणे पावसाच्या जोरदार सरींनी सारा परिसर धुवून निघाला. ओढेनाले तुडुंब भरून वाहत होते. या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला. यामुळे उष्णतेने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. पावसाने शेतात ठिकठिकाणी पाणी साचले होते. खरीपाच्या पेरणीपूर्व मशागतीसाठी आजचा पाऊस अत्यंत उपयुक्त असून, शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.