सातारा शहरातील
ओढ्यांची स्वच्छता
सातारा : सातारा पालिकेकडून ओढे व नाल्यांच्या स्वच्छतेचे काम पुन्हा एकदा हाती घेण्यात आले आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे माची पेठ, केसरकर पेठ व बोगदा परिसरातील ओढे, नाले कचऱ्याने तुडुंब भरले आहेत. प्रवाह बंद झाल्याने या ओढ्यांमधील व नाल्यातील पाणी रस्त्यावरून वाहत होते. त्यामुळे नागरिकांसह पादचाऱ्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत होता. आरोग्य विभागाने स्वच्छतेचे काम पुन्हा हाती घेतल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
महाबळेश्वरात
पर्यटकांची रेलचेल
महाबळेश्वर : थंड हवेचे व सर्वाधिक पावसाचे ठिकाण असलेल्या महाबळेश्वर व पाचगणीतील पर्यटन सुरू झाले असून, अनेक हौशी पर्यटक या पर्यटनस्थळांना भेटी देत आहेत. महाबळेश्वर परिसरात अजूनही पावसाने उघडीप दिलेली नाही. त्यामुळे अनेक पर्यटक पावसात भिजून पर्यटनाचा व येथील निसर्गसौंदर्याचा मनमुराद आनंद लुटत आहेत. काही ब्रिटिशकालीन पॉइंट पर्यटकांसाठी खुले करण्यात आल्याने पर्यटकांमधून समाधान व्यक्त होत आहे.