मसूर : मसूर व परिसरात गेल्या दोन दिवसांपासून पडत असलेल्या संततधार पावसाने शेतीची कामे ठप्प झाली आहेत. अनेक ठिकाणी शेती जलमय झाली आहे तर वाऱ्यामुळे आडसाली ऊसाचे पीक आडवे झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागणार आहे. तर खरिपाची पेरणी व टोकणी करून उगवण झालेली पिके दुपार धरत असल्याने पावसाची वाट पाहत बसलेले शेतकरी मात्र सुखावले आहेत.
मसूर व परिसरात गेल्या दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे नदी, ओढे, नाले भरून वाहत आहेत तर खरिपाची पेरणी व टोकणी करून पिकाची अंतर्गत मशागत म्हणजेच कोळपणी, भांगलणी करून पावसाची वाट पाहत बसलेल्या शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. पेरणी व टोकणी केलेली पिके पाण्याअभावी दुपार धरत होती. त्यामुळे शेतकरी आभाळाकडे डोळे लावून पावसाची वाट पाहत होते. प्रतिवर्षी बेंदूर सणाला पाऊस असतो. या आशेवर बेंदूर सणाला तरी पाऊस पडतो की नाही, या चिंतेतच शेतीतील अंतर्गत मशागतीची काम करत होते. बेंदूर सणाच्या आधीच दोन दिवस पावसाने हजेरी लावल्याने खरीप हंगाम बहरणार, असे चित्र दिसत आहे.
या पावसावेळी वारेही जोराने वाहत होते. पाऊस पडल्याने ऊसाच्या मुळ्या मोकळ्या झाल्या होत्या. याचा परिणाम म्हणून वाऱ्यामुळे ऊसाचे पीक भुईसपाट झाल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागणार आहे. तर अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचून राहिल्याने पिके पाण्याखाली गेल्याचे दिसत आहे. त्यामुळेही शेतीचे नुकसान होणार असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.
फोटो आहेत
1) कवठे येथे पाऊस व वाऱ्यामुळे ऊसाचे पीक आडवे झाले आहे.
2) शेतामध्ये पावसाचे पाणी साचल्याने शेतीला तळ्याचे स्वरुप आले आहे.