सातारा : जिल्हाधिकाऱ्यांनी बुधवारी रात्री महागाव येथे टाकलेल्या छाप्याप्रकरणी वाळू चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधिताने जैतापूरला वाळू उपशाचा ठेका घेतलेला असताना उपसा मात्र महागावला करीत असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, या छाप्यातील ६५ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, महसूल उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने बुधवारी रात्री सातारा तालुक्यातील महागाव येथे छापा टाकल्याने वाळूमाफियांचे धाबे दणाणले आहेत. दरम्यान, महागाव येथे वाळू उपसा करणारा आनंदा रामू यादव (वय ५४, रा. कामाठीपुरा, सातारा) याचा जैतापूरला वाळू उपसा करण्याचा ठेका असल्याचे निष्पन्न झाले आहे. आनंदा यादव याच्याविरुद्ध गुरुवारी शहर पोलीस ठाण्यात वाळू चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. खेडचे मंडलाधिकारी संदीप मानसिंग नलावडे (रा. वाढे) यांनी याप्रकरणी फिर्याद दाखल केली. चार हजार रुपये प्रतिब्रास दराने १३०० ब्रास वाळू चोरण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या दराने चोरलेल्या वाळूची किंमत ५२ लाख रुपये आहे. (प्रतिनिधी)वाहनांच्या मालकांचा शोधमहागाव येथे वाळू चोरीप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईत तीन पोकलॅन, पाच ट्रॅक्टर, तीन ट्रॉली, दोन डंपर, एक ट्रक अशी वाहने जप्त करण्यात आली होती. ही वाहने कोणाची आहेत, हे अद्याप समजू शकले नसून जिल्हा प्रशासनाने संबंधित वाहनांचे चेसीस नंबर उपविभागीय परिवहन अधिकाऱ्यांकडे तपासणीसाठी पाठविले आहेत. त्यानंतरच संबंधित वाहनांचे मालक कोण, ते स्पष्ट होणार असून, त्यांच्यावरही वाळू चोरीचे गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे.वीज चोरीचाही गुन्हामहागाव येथील वाळू ठेक्याच्या ठिकाणी वीजवाहिन्यांवर आकडे टाकून वीज चोरली जात असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे आनंदा यादव याच्याविरुद्ध वीज चोरीचाही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ठेका जैतापूरला; उपसा महागावला
By admin | Published: July 10, 2015 12:43 AM