वाई : ‘कोरोना युद्धात डॉक्टर, आरोग्य कर्मचाऱ्यांचे योगदान मोलाचे आहे,’ असे उद्गार पुणे येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शिवाजीराव शिर्के यांनी काढले.
पसरणी (ता. वाई) येथे रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त ज्येष्ठ नागरिक संघ व मारुती फाउंडेशनच्यावतीने ७५ महिला व पुरुष, ज्येष्ठ नागरिकांचा, तसेच डाॅक्टर, सेविका, अंगणवाडी सेविका व आशाताई यांचा सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ देऊन कोविड योद्धा पुरस्काराने सन्मान करण्यात आला. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
यावेळी सरपंच हेमलता गायकवाड, उपसरपंच सुनील महांगडे, डाॅ. सूरज महांगडे, डाॅ. प्रज्ञा गायकवाड, योगेश पाटील, सुनील फरांदे, ईश्वरी बनकर, फरांदे, पिंगळे, बाळासाहेब शिर्के, अरुण शिर्के यांची प्रमुख उपस्थिती होती.
बाळासाहेब शिर्के म्हणाले, ‘गेली २१ वर्षे गावासह जिल्ह्यातील गरजू विद्यार्थ्यांना मारुती फाउंडेशन मदतीचा हात देत आहे. ज्येष्ठ नागरिक संघाच्या माध्यमातून गावासाठी चांगले कार्य करणाऱ्यांचा सन्मान करण्यात येत आहे. ‘एक नेक काम गाव के नाम’ हे ब्रीद घेऊन कोरोनाच्या काळामध्ये आपला जीव धोक्यात घालून गावातील डाॅक्टरांनी ग्रामस्थांचे प्राण वाचविले आहेत. यात ते स्वत: बाधित झाले तरीही त्यांनी बरे होऊन रुग्णसेवा सुरू केली.’
श्रीगणेश शेंडे यांनी सूत्रसंचालन केले. बाजीराव शिर्के, बाबूराव येवले, विठ्ठल महांगडे, रामभाऊ येवले, अंकुश वरे यांनी स्वागत केले. महादेव महांगडे यांनी आभार मानले.